भारताच्या पुरूष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मलेशियाचा ५-१ असा धुव्वा उडवत सुवर्णपदक निश्चित केलं. शनिवारी झालेल्या या सामन्यातील विजयासह भारताने इतिहासात प्रथमच सलग दुसऱ्यांदा आशियाई हॉकी विजेतेपद कायम राखलं. या विजयासह भारताने २०२८च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी पात्रताही मिळवली आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचं हे हॉकीमधील पाचवं सुवर्णपदक ठरलं. विशेष म्हणजे, २०२६ची स्पर्धा भारतासाठी ऐतिहासिक ठरली. कारण पहिल्यांदाच भारताच्या पुरुष आणि महिला या दोन्ही हॉकी संघांनी एकाच आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे.

महिला संघाने याआधी चीनचा पराभव करत ४४ वर्षांचा सुवर्णपदकाचा दुष्काळ संपवला होता. तर हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील पुरुष संघाने अंतिम फेरीत पोहोचण्यापूर्वी उपांत्य सामन्यात आशियाई क्रीडा स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ४-३ असा थरारक पराभव केला होता.

भारताने मलेशियाविरूद्ध फायनलमध्ये कसा मिळवला एकतर्फी विजय?

मलेशियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताने पहिल्याच क्वार्टरमध्ये आघाडी घेतली. हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरचं गोलमध्ये रूपांतर करत भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र, अवघ्या तीन मिनिटांत मलेशियाने गोल करत भारताची आघाडी बरोबरीत आणली.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने पुन्हा आघाडी मिळवली. शिलानंद लकडाने सर्कलमध्ये शानदार धाव घेत भारताला पेनल्टी कॉर्नर मिळवून दिला. पेनल्टी कॉर्नरच्या इंजेक्शनवर हार्दिकने चेंडू चांगला स्टॉप केला आणि त्यानंतर जुगराजने कमालीचा फटका लगावत गोल केला आणि भारताला पुन्हा २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

यानंतर भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावेळी भारताने वेगळी रणनीती वापरत चेंडू गोलरक्षकाच्या डाव्या बाजूला असलेल्या खेळाडूकडे पाठवला. चेंडू गोलपोस्टजवळ गोलरक्षकाच्या शेजारी उभ्या असलेल्या खेळाडूला लागल्याचं दिसताच पंचांनी भारताला पेनल्टी स्ट्रोक दिला. हार्दिक सिंगने कोणतीही चूक न करता चेंडू जाळ्याच टाकत भारताची आघाडी ३-१ अशी केली. त्यामुळे अंतिम सामन्यावर भारताने आपली पकड आणखी मजबूत केली.

चौथ्या क्वार्टरमध्ये लकडाने आणखी एक गोल करत भारताची आघाडी ४-१ अशी केली आणि मलेशियाच्या पुनरागमनाच्या सर्व आशा संपवल्या. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंगने आणखी एक शानदार ड्रॅग-फ्लिक करत सामन्यातील आपला दुसरा गोल नोंदवला. त्यामुळे भारताने ५-१ असा दणदणीत विजय मिळवत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केलं. नागोया येथे मिळालेलं हे भारताचं स्पर्धेतील २१वं सुवर्णपदक ठरलं. या विजयामुळे भारताने पदकतालिकेत उझबेकिस्तानला मागे टाकत चौथ्या स्थानावर झेप घेतली.