स्वयंगोल स्वीकारल्यानंतरही आत्मविश्वासाने खेळ करीत भारताने न्यूझीलंडवर ४-२ असा दणदणीत विजय मिळवला आणि चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत ‘अ’ गटात अव्वल स्थानी झेप घेतली. या स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद करून भारताने सहा गुणांची कमाई केली आहे. साखळी गटात दोन्ही सामने जिंकणारा भारत हा एकमेव संघ आहे.
पहिल्या सामन्यात इंग्लंडला हरविणाऱ्या भारताने न्यूझीलंडविरुद्धही सुरेख सांघिक खेळाचे प्रदर्शन केले. सामन्याची सुरुवात भारतासाठी निराशाजनक ठरली. तिसऱ्या मिनिटाला सरदारा सिंगने दिलेल्या पासवर रूपिंदर सिंगला चेंडूवर नियंत्रण मिळवता आले नाही आणि चेंडू भारताच्याच गोलजाळ्यात विसावला. त्यामुळे कोणतेही कष्ट न घेता न्यूझीलंडच्या खात्यात एका गोलची भर पडली. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी धारदार आक्रमण करीत मध्यंतराला ३-१ अशी आघाडी घेतली.
आकाशदीप सिंगने १०व्या मिनिटाला सरदाराच्या पासवर सुरेख फटका मारून गोल केला आणि १-१ अशी बरोबरी साधली. गुरविंदर सिंग चंडीने (१४व्या मिनिटाला) मैदानी गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. व्ही. आर. रघुनाथने २५व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारा भारतासाठी तिसरा गोल झळकावला. उत्तरार्धात न्यूझीलंडच्या निकोलस विल्सन याने दुसऱ्याच मिनिटाला गोल करत सामन्यात रंगत आणली. मात्र ६५व्या मिनिटाला दानिश मुज्तफा याने भारतासाठी चौथा गोल केला.
भारताच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त करीत प्रशिक्षक मायकेल नॉब्स म्हणाले, ‘‘न्यूझीलंडविरुद्ध आम्ही ऑलिम्पिकपूर्वी व ऑलिम्पिकमध्ये दारुण पराभव स्वीकारला होता. मात्र आमच्या खेळाडूंनी जिद्दीने खेळ केला. युवा खेळाडूंमध्ये चांगला समन्वय दिसून येत आहे. लागोपाठ दोन सामने जिंकल्यामुळे संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. प्रतिष्ठेच्या स्पर्धेत खेळण्याचा अनुभव नसतानाही गोलरक्षक टी. आर. पोतुनुरी याने कोणतेही दडपण न घेता भक्कम गोलरक्षण केले आहे.’’
आता साखळी गटातील तिसऱ्या लढतीत भारताची मंगळवारी जर्मनीशी गाठ पडणार आहे. अन्य सामन्यात, इंग्लंडने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जर्मनीला ४-१ असा पराभवाचा धक्का दिला.