भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिका

आज होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यावरही पावसाचे सावट

पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात अवघ्या चार धावांनी पराभव स्वीकारावा लागलेल्या भारतीय संघाला आता विजय मिळवणे अनिवार्य आहे. त्यामुळे मेलबर्नच्या स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात यश संपादन करण्याच्या हेतूनेच विराटसेना मैदानात उतरणार आहे. मात्र या सामन्यातही पावसाचा वर्षांव होण्याची चिन्हे आहेत.

या सामन्यात भारतीय संघात अनेक संघबदल अपेक्षित आहेत. सलग सात ट्वेन्टी-२० मालिका जिंकणाऱ्या भारताला आठवीही मालिका जिंकण्यासाठी आणखी कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहेत. सलामीवीर म्हणून रोहित शर्मा व शिखर धवन यांची जोडी कायम राहणार असली तरी तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आलेला लोकेश राहुल सातत्याने अपयशी ठरत आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यानंतर त्याला एकाही लढतीत ३० धावांपुढे जाता आले नाही. त्यामुळे या स्थानासाठी श्रेयस अय्यर किंवा मनीष पांडेपैकी एकाचा विचार संघ व्यवस्थापन करू शकते. स्वत: विराट कोहलीदेखील या सामन्यात धावा काढण्यासाठी उत्सुक असेल.

अष्टपैलू म्हणून संघात स्थान मिळालेल्या कृणाल पंडय़ाला पहिल्या लढतीत सपशेल अपयश आले. त्यामुळे त्याच्याऐवजी लेग-स्पिनर युजवेंद्र चहलचा संघात समावेश होण्याची शक्यता बळावली आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार व खलिल अहमद हे वेगवान त्रिकूट कायम राखण्यावर संघ व्यवस्थापन भर देईल.

मात्र क्षेत्ररक्षणावर भारताला प्रामुख्याने लक्ष पुरवण्याची गरज आहे. प्रथम लढतीत तीन झेल सोडल्यामुळे भारताला मोठा फटका पडला. त्याशिवाय अ‍ॅडम झम्पाच्या फिरकीवरही तोडगा काढण्यासाठी भारताला मेहनत घ्यावी लागेल.

४५  तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना विराट कोहलीची सरासरी १७८ डावांत ४५ इतकी आहे. मात्र चौथ्या क्रमांकावर त्याची फलंदाजीची सरासरी थेट ३०च्या खाली कोसळते.

१४  ऑस्ट्रेलिया-भारत यांच्यातील सर्व गोलंदाजांपैकी भारताच्या कुलदीप यादवची बळी मिळवण्याची सरासरी सवरेत्कृष्ट आहे. प्रत्येकी ट्वेन्टी-२० सामन्यात दर १४ चेंडूंत तो एका फलंदाजाला बाद करतो.

संघ

भारत :  विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), ऋषभ पंत, कृणाल पंडय़ा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, खलिल अहमद, उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर.

 ऑस्ट्रेलिया : आरोन फिन्च (कर्णधार), अ‍ॅश्टन अगर, जेसन बेहरेनडॉर्फ, अ‍ॅलेक्स कॅरी, नॅथन कुल्टर-नाईल, ख्रिस लीन, बेन मॅकडरमॉट, ग्लेन मॅक्सवेल, डार्सी शॉर्ट, बिली स्टॅनलेक, मार्कस स्टोइनिस, अ‍ॅण्ड्रय़ू टाय, अ‍ॅडम झम्पा.

* सामन्याची वेळ : दुपारी १.३० वाजल्यापासून

* थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स आणि सोनी टेन ३