India ODI Squad Changes: इंग्लंडविरूद्ध टी-२० मालिकेत लाजिरवाणा पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघ आता वनडे मालिका खेळणार आहे. तीन सामन्यांची वनडे मालिका १४ जुलैपासून खेळवली जाईल. या वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघात बीसीसीआयने दोन मोठे बदल केले आहेत. टी-२० मालिकेदरम्यान दुखापत झालेल्या दोन खेळाडूंच्या जागी बदली खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे.

हर्षित राणा व वरूण चक्रवर्ती हे दोन्ही गोलंदाज चौथ्या टी-२० सामन्यापूर्वी दुखापतीमुळे मालिकेबाहेर झाले. चौथ्या आणि पाचव्या सामन्यातही प्लेईंग इलेव्हनमध्ये यामुळे मोठे बदल करावे लागले होते. हर्षित राणा व वरूण दोघेही नुकतेच दुखापतीमधून सावरत संघात पोहोचले होते आणि पहिल्याच मालिकेत दोघांनाही पुन्हा दुखापत झाल्याने ते वनडे आणि झिम्बाब्वेविरूद्ध टी-२० मालिकेतून बाहेर झाले होते.

हर्षित राणा-वरूण चक्रवर्तीच्या जागी कोणाला मिळाली संधी?

हर्षित राणा व वरूण चक्रवर्तीच्या जागी बीसीसीआयने प्रिन्स यादव व रवि बिश्नोई यांना संघात स्थान दिलं आहे. प्रिन्स यादवने टी-२० मालिकेत सुरूवात चांगली केली होती, पण इतर गोलंदाजांप्रमाणेच इंग्लंडच्या फलंदाजांनी त्याचीदेखील धुलाई केली. तर रवि बिश्नोईची तर इंग्लंडच्या फलंदाजांनी तिसऱ्या टी-२० सामन्यात धुलाई करत त्याच्या दोन षटकांमध्ये भारताच्या हातात असलेला सामना इंग्लंडने हिसकावून घेत विजय मिळवला होता. यानंतर रवि बिश्नोईला पुढील दोन सामन्यांत प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती.

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांना दुखापत झाली. वेगवान गोलंदाज हर्षित राणा याच्या उजव्या पायाच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाल्यामुळे, तो एकदिवसीय (ODI) मालिकेतून बाहेर पडला आहे. दुसरीकडे, फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याच्या डाव्या पायाच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली आहे, ज्यामुळे त्याला झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळता येणार नाही. आता हे दोन्ही खेळाडू रिहॅबिलिटेशनसाठी बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये जातील.

वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवने आयर्लंडविरुद्ध आपला पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना आणि अफगाणिस्तानविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना यापूर्वीच खेळला आहे; आता इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय संघात स्थान देऊन निवडकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावरील आगामी मालिकेसाठी श्रेयस अय्यरची कर्णधारपदी, तर तिलक वर्माची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या मालिकेत टीम इंडियाच्या कामगिरीवर विशेष लक्ष असणार आहे.