कोलकाता कसोटीवरही निर्विवाद वर्चस्व गाजवणारा इंग्लंड संघ तिसऱ्या कसोटीत विजयाच्या उंबरठय़ावर येऊन पोहोचला आहे. एकाच सत्रात भारताचे अव्वल शेर तंबूत परतल्यानंतर रवीचंद्रन अश्विनच्या झुंजार खेळीमुळे ‘आजचा पराभव उद्यावर’ अशी भारताची स्थिती आहे. अश्विनच्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे भारताने डावाने पराभवाची नामुष्की टाळली असून दुसऱ्या डावात ३२ धावांची आघाडी घेतली आहे. पाहुण्या गोलंदाजांनी भारताचे पुरते ‘वस्त्रहरण’ करून सलग दुसरा सामना जिंकण्याच्या दिशेने कूच केली आहे.
पहिल्या डावात २०७ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या सलामीवीरांनी आश्वासक सुरुवात केली खरी.
पण आतापर्यंत निर्जीव वाटणाऱ्या इडन गार्डन्सच्या खेळपट्टीने आपला खरा रंग दाखवण्यास सुरुवात केली आणि उपाहारानंतरच्या सत्रात भारताच्या दिग्गज फलंदाजांनी सपेशल शरणागती पत्करली. भारताचे सहा फलंदाज एकापाठोपाठ माघारी परतले. त्यामुळे चौथ्या दिवशीच भारतावर पराभवाचे संकट ओढवणार, असे चित्र दिसत होते. पण अश्विनने तळाच्या फलंदाजांना हाताशी धरून किल्ला लढवला. त्यामुळे भारताचे ‘आजचे मरण उद्यावर’ पडले आहे. ८ बाद १५९ अशा स्थितीतून अश्विनने शेवटच्या दोन विकेटसाठी ८० धावांची भर घातली आणि सामना पाचव्या दिवसावर नेला. भारताची चौथ्या दिवसअखेर ९ बाद २३९ अशी स्थिती आहे. सामन्याचा एक दिवस शिल्लक असून इंग्लंडला मालिकेत २-१ अशी आघाडी घेण्याची संधी आहे.
सेहवाग (४९) आणि गंभीर (४०) यांनी ८६ धावांची सलामी देत भारताला चांगली सुरुवात करून दिली. दुसऱ्या सत्रात मात्र सामन्याचे चित्रच पालटले. ज्या खेळपट्टीवर भारताचे गोलंदाज प्रभावहीन ठरले तेथे इंग्लिश गोलंदाजांनी मात्र भारतीय फलंदाजांवर हुकुमत गाजवण्यास सुरुवात केली. चेतेश्वर पुजारा (८), सचिन तेंडुलकर (५), युवराज सिंग (११), विराट कोहली (२०) आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी (०) हे आघाडीचे फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. सामना अनिर्णीत राखण्यासाठी धडपडणाऱ्या भारताने पहिले सहा फलंदाज अवघ्या ३६ धावांच्या फरकाने गमावले.
ऑफस्पिनर ग्रॅमी स्वानच्या आत जाणाऱ्या चेंडूला टोलवण्याचा प्रयत्न सेहवागने केला, पण चेंडू बॅट आणि पॅडच्या मधून थेट यष्टय़ांवर आदळला. स्वानने इंग्लंडला पहिले यश मिळवून दिल्यानंतर भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केली. गंभीरने या मालिकेत दुसऱ्यांदा फलंदाजाला धावचीत केले. यावेळी शिकार ठरला तो भारतातर्फे मालिकेत सर्वाधिक धावा करणारा पुजारा. वेगवान गोलंदाज स्टीव्हन फिनने दोन षटके निर्धाव टाकून गंभीरवर दडपण आणले. तिसऱ्या षटकात पाच चेंडू निर्धाव टाकल्यानंतर अखेरच्या चेंडूवर एकेरी धाव घेण्याच्या नादात त्याने पुजाराला धावबाद केले. पुढील षटकात पंचांनी ‘जीवदान’ दिल्याचा फायदा गंभीरला उठवता आला नाही. फिनच्या गोलंदाजीवर तो यष्टिरक्षक मॅट प्रायरकडे झेल देऊन तंबूत परतला. ‘पॅडल-स्विप’चा फटका मारण्याच्या प्रयत्नात सचिन तेंडुलकरनेही जोनाथन ट्रॉटकडे झेल दिला.
कोहली चार धावांवर असताना इयान बेलने त्याचा झेल सोडला. वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने युवराजचा त्रिफळा उडवल्यानंतर धोनीला पहिल्या स्लिपमध्ये अ‍ॅलिस्टर कुककरवी झेलबाद करत भारताला दोन हादरे दिले. कोहली माघारी परतल्यानंतर झहीर खाननेही (०) त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत पॅव्हेलियन गाठले. नऊ विकेट्स तंबूत परतल्यामुळे पराभव अटळ असताना आता चमत्कारच भारताला वाचवू शकतो.
तत्पूर्वी ६ बाद ५०९वरून खेळणाऱ्या इंग्लंडचा दुसरा डाव अध्र्या तासाभरातच संपुष्टात आला. अश्विनने तळाच्या दोन फलंदाजांना लागोपाठच्या चेंडूंवर बाद केल्याने इंग्लंडला शनिवारी १४ धावांची भर घालता आली. त्यांचा पहिला डाव ५२३ धावांवर संपला. अश्विनने तीन तर प्रग्यान ओझाने चार बळी मिळवले.     
धावफलक
भारत (पहिला डाव) : ३१६
इंग्लंड (पहिला डाव) : अ‍ॅलिस्टर कुक धावचीत १९०, निक कॉम्प्टन पायचीत गो. ओझा ५७, जोनाथन ट्रॉट झे. धोनी गो. ओझा ८७, केव्हिन पीटरसन पायचीत गो. अश्विन ५४, इयान बेल झे. धोनी गो. इशांत ५, समित पटेल झे. सेहवाग गो. ओझा ३३, मॅट प्रायर झे. धोनी गो. झहीर ४१, ग्रॅमी स्वान झे. सेहवाग गो. ओझा २१, स्टीव्हन फिन नाबाद ४, जेम्स अँडरसन झे. सेहवाग गो. अश्विन ९, मॉन्टी पनेसार पायचीत गो. अश्विन ०, अवांतर (बाइज-१३, लेगबाइज-४, नोबॉल-५) २२, एकूण- १६७.३ षटकांत सर्व बाद ५२३.
बाद क्रम : १-१६५, २-३३८, ३-३५९, ४-३९५, ५-४२०, ६-४५३, ७-५१०, ८-५१०, ९-५२३, १०-५२३.
गोलंदाजी : झहीर खान ३१-६-९४-१, इशांत शर्मा २९-८-७८-१, आर. अश्विन ५२.३-९-१८३-३, प्रग्यान ओझा ५२-१०-१४२-४, युवराज सिंग ३-१-९-०.
भारत (दुसरा डाव) : गौतम गंभीर झे. प्रायर गो. फिन ४०, वीरेंद्र सेहवाग त्रि. गो. स्वान ४९, चेतेश्वर पुजारी धावचीत ८, सचिन तेंडुलकर झे. ट्रॉट गो. स्वान ५, विराट कोहली झे. प्रायर गो. फिन २०, युवराज सिंग त्रि. गो. अँडरसन ११, महेंद्रसिंग धोनी झे. कुक गो. अँडरसन ०, आर. अश्विन खेळत आहे ८३, झहीर खान त्रि. गो. फिन ०, इशांत शर्मा त्रि. गो. पनेसार १०, प्रग्यान ओझा खेळत आहे ३, अवांतर (बाइज-८, लेगबाइज-२) १०, एकूण- ८३ षटकांत ९ बाद २३९.
बाद क्रम : १-८६, २-९८, ३-१०३, ४-१०७, ५-१२२, ६-१२२, ७-१५५, ८-१५९, ९-१९७.
गोलंदाजी : जेम्स अँडरसन १५-४-३८-२, स्टीव्हन फिन १७-६-३७-३, मॉन्टी पनेसार २२-१-७५-१, ग्रॅमी स्वान २८-९-७०-२, समित पटेल १-०-९-०.

फलंदाजांमध्ये संयमाचा अभाव असल्यामुळेच भारतावर ही नामुष्की ओढवली आहे. भारताच्या पराभवाला फलंदाजच जबाबदार आहेत. खेळपट्टीवर उभे राहिल्यास, धावा करणे कठीण नाही. हे कसोटी क्रिकेट असल्यामुळे फलंदाजांनी संयम बाळगायला हवा. भारताने पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारली असती तर आता चित्र काही वेगळेच असते. गेल्या दोन कसोटी सामन्यांत भारताला पुरेशा धावा उभारता आल्या नाहीत. इंग्लिश फलंदाजांनी संयम दाखवला, त्यामुळेच त्यांना मोठी मजल मारता आली. भारतीय फलंदाज मात्र निष्प्रभ ठरले, ही चिंता मला सतावत आहे.
– वीरेंद्र सेहवाग, भारताचा सलामीवीर.

वर्षांच्या सुरुवातीला आम्ही पाकिस्तानकडून ०-३ अशा फरकाने हरलो, त्यामुळे आम्हाला उपखंडातील खेळपट्टय़ांवर कामगिरी उंचावण्याची प्रेरणा मिळाली. येथील वातावरणाशी जुळवून घेत आम्ही आमच्या खेळावर प्रचंड मेहनत घेतली. त्याचेच फळ आम्हाला मिळत आहे. तिसरी कसोटी जिंकून आम्ही मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली तरी चौथ्या कसोटीत आम्ही त्याच जोशाने खेळ करू. भारताला कमी लेखण्याची चूक आम्ही करणार नाही. इंग्लंडची सांघिक कामगिरी चांगली होतेय, ही जमेची बाजू म्हणावी लागेल.
– स्टीव्हन फिन, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज.