पीटीआय, नवी दिल्ली
बुद्धिबळ खेळात भारताने चांगली प्रगती केली आहे आणि योग्य दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. एकूणच बुद्धिबळात भारत सर्वश्रेष्ठ बनण्यास फार वेळ लागणार नाही, असे मत पाच जगज्जेतेपद मिळवणाऱ्या मॅग्नस कार्लसनने व्यक्त केले.कार्लसन सध्याचा जलदगती प्रकारातील जगज्जेता असून, सध्याच्या पिढीतील एक लोकप्रिय खेळाडू आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या पहिल्या ग्लोबल चेस लीगसाठी टेक महिंद्रा आणि जागतिक बुद्धिबळ संघटनेने कार्लसनला करारबद्ध केले. त्या वेळी बोलताना कार्लसनने भारतातील बुद्धिबळ प्रगतीचे कौतुक केले. ‘‘भारतीय बुद्धिबळ खेळाडू खूप चांगली कामगिरी करत आहेत. जागतिक स्तरावर भारतीय खेळाडूंची चांगली छाप आहे. गेल्या वर्षी भारताने ‘बुद्धिबळ ऑलिम्पियाड’चेही यशस्वी आयोजन केले होते. लवकरच तो दिवस येईल, जेव्हा बुद्धिबळात भारत एक आघाडीचे राष्ट्र म्हणून गणले जाईल,’’ असे कार्लसन म्हणाला.




कार्लसन ग्लोबल चेस लीगमधील एक ‘आयकॉन’ खेळाडू असेल. ‘‘माझ्यासाठी लीगचा भाग बनणे ही एक रोमांचक संधी आहे. आवडत्या खेळात काहीतरी वेगळे करण्याचा आनंद या निमित्ताने मला मिळणार आहे. अशा पद्धतीत मी कधी खेळलेलो नाही. पण, लीगची पद्धत वेगळी आहे आणि भविष्यातही अशा पद्धतीत मी खेळण्यास उत्सुक असेल,’’ असे कार्लसनने सांगितले.
ग्लोबल चेस लीग ही बुद्धिबळ खेळातील पहिलीच संघावर आधारित स्पर्धा आहे. एकूण सहा संघ दुहेरी साखळी फेरी पद्धतीने एकूण १० सामने खेळतील. प्रत्येक सामन्यातील विजेत्याचा निर्णय एकाच वेळी खेळल्या जाणाऱ्या सर्वोत्तम सहा पटावरील गुणांवर ठरवला जाणार आहे. अव्वल दोन संघ २ जुलै रोजी होणाऱ्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. विजेत्याला जागतिक संघ असा किताब देण्यात येणार आहे.
कार्लसन नेहमीच बुद्धिबळातील प्रायोगिक विचारांसाठी लक्षात राहतो. बुद्धिबळाचे सांघिक स्वरूपातील सामने निश्चितच वेगळा आनंद देतील, असे सांगून कार्लसनम्हणाला,‘‘वैयक्तिकरीत्या नेहमीच सांघिक स्पर्धा आणि त्या निमित्ताने निर्माण होणारी सांघिक भावना मला नेहमीच भावते. त्यामुळे मी या लीगची आतुरतेने वाट पाहत असून, माझ्या संघातील अन्य खेळाडूंना भेटण्यासाठी उत्सुक आहे. विशेषत: मला भारताच्या युवा पिढीशी स्पर्धा करायला आवडेल. लीगचे आणखी एक विशेष म्हणजे पुरुष आणि महिला खेळाडू एकाच टप्प्यावर एकमेकांविरुद्ध स्पर्धा करू शकतील. ही वेगळीच कल्पना आहे.’’