ICC Team Rankings After Yearly Update: भारतीय क्रिकेट संघाचा व्हाईट बॉल फॉरमॅटमध्ये जगभरात डंका आहे. भारताने २०२४ मध्ये टी-२० आणि वनडेमध्ये चांगली कामगिरी करत आयसीसी रँकिंगमध्ये आपला दबदबा राखला आहे. आयसीसी म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलने वर्षभरातील अपडेटनंतर आयसीसी रँकिंग जाहीर केली आहे. ज्यामध्ये भारतीय संघ वनडे आणि टी-२० मध्ये पहिल्या स्थानी आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, टीम इंडियाने जून २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकला आणि त्यानंतर मार्च २०२५ च्या सुरूवातीला भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. वार्षिक अपडेटनंतर, आयसीसी एकदिवसीय संघ क्रमवारीत भारताचे १२४ रेटिंग गुण झाले आहेत. पूर्वी ते १२२ रेटिंग पॉइंट्स होते, त्यामुळे भारताला दोन पॉइंट्सचा फायदा झाला आहे. त्यानंतर, चॅम्पियन्स ट्रॉफीचा उपविजेता संघ न्यूझीलंड दुसऱ्या स्थानी आहे. त्यांनी विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले.

ICC ODI Team Rankings: वनडे रँकिंगमध्ये टॉप-१० संघ कोण?

ऑस्ट्रेलिया वनडे रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरली आहे. वार्षिक अपडेटनंतर आयसीसी रँकिंगमध्ये श्रीलंकेला चांगलाच फायदा झाला आहे. गेल्या काही महिन्यांत, घरच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियाला पराभूक केल्याने त्यांना खूप फायदा झाला आहे. संघ आता पाच रेटिंग गुणांच्या वाढीसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांनी पाकिस्तान (पाचवे) आणि दक्षिण आफ्रिका (सहावे) यांना मागे टाकले आहे.

पाकिस्तानला एक रेटिंग पॉइंट जास्तीचा मिळाला आहे तर आफ्रिका संघाला चार गुण गमवावे लागले आहेत. उर्वरित संघ अफगाणिस्तान (सातवे) आणि इंग्लंड (आठवे) आहेत. अलिकडच्या अपयशामुळे इंग्लिश संघाची चांगलीच घसरण झाली. संघाला ४ गुणांचा तोटा झाला आहे. वेस्ट इंडिज (नवव्या) आणि बांगलादेश (दहाव्या) हे संघ टॉप-१० मध्ये आहेत.

ICC T20I Team Rankings: टी-२० रँकिंगमध्ये टॉप-१० संघ कोण?

आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये भारतीय संघ सर्वाधिक २७१ गुणांसह पहिल्या स्थानी आहे. तर दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा संघ आहे. दोन्ही संघांमधील फरक ९ गुणांचा आहे. २०२२ टी-२० विश्वचषक विजेता इंग्लंड तिसऱ्या, न्यूझीलंड चौथ्या, वेस्ट इंडिज पाचव्या आणि दक्षिण आफ्रिका सहाव्या स्थानावर आहे. श्रीलंका सातव्या, पाकिस्तान आठव्या, बांगलादेश नवव्या आणि अफगाणिस्तान दहाव्या स्थानावर आहे. वार्षिक अपडेटनंतर आयसीसीने प्रथमच आयसीसी टी-२० क्रमवारीत १०० संघांना स्थान दिले आहे. २०१९ मध्ये जेव्हा जागतिक क्रमवारी पहिल्यांदा जाहीर झाली तेव्हा ८० संघ होते.

कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या स्थानी आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आणि न्यूझीलंडविरूद्धची कसोटी मालिका गमावल्याचा भारताला मोठा फटका बसला आहे. भारतीय संघ कसोटी क्रमवारीत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. दुसऱ्या स्थाावर इंग्लंडचा संघ आहे, तर तिसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे. इंग्लंडला दोन स्थानांचा फायदा झाला आहे. तर भारत आणि आफ्रिकेचे संघ एकेका स्थानाने खाली घसरले आहेत.