भारताच्या किदम्बी श्रीकांत, परुपल्ली कश्यप आणि पी. व्ही. सिंधू यांनी आपापल्या प्रतिस्पध्र्यावर मात करीत इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. महिलांच्या दुहेरीत मात्र भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी या जोडीचे आव्हान संपुष्टात आले.

पुरुष एकेरीत श्रीकांतने उपांत्यपूर्व फेरीत भारताच्याच बी. साईप्रणीतला नमवले. या सामन्यात साईप्रणीतने अटीतटीच्या झुंजीत पहिला गेम २३-२१ असा जिंकत श्रीकांतला आव्हान दिले. दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतने २१-११ असे दमदार पुनरागमन करीत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. तिसरा गेम पुन्हा अत्यंत चुरशीचा झाला. त्यात श्रीकांतने २१-१९ अशी बाजी मारली. कश्यपने तैपेईच्या वॅँग झु वेईवर सलग दोन गेममध्ये २१-१६, २१-११ अशी मात केली.

महिला एकेरीत सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या मिआ ब्लिचफेल्टला २१-९, २२-२० असे पराभूत केले. त्यामुळे सिंधूला आता उपांत्य फेरीत चीनच्या हे बिंगजिओ हिच्याशी झुंजावे लागणार आहे.

महिला दुहेरीत इंडोनेशियाच्या अप्रियानी रहायू आणि ग्रेसिया पोल्ली जोडीने अश्विनी आणि सिक्की जोडीला २१-१०, २१-१८ असे पराभूत केले. याचप्रमाणे द्वितीय मानांकित जाँगकॉलफान किटिथाराकुल आणि रविंदा प्राजोंगजल जोडीने अपर्णा बालन आणि श्रुती केपी जोडीचा २१-८, २१-११ असा पराभव केला. पुरुष दुहेरीत भारताच्या मनू अत्री आणि सुमीत रेड्डी या जोडीने भारताच्याच प्रणव जेरी चोप्रा आणि शिवम शर्मा या जोडीला २१-१०, २१-१२ असे नमवले.