कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धा : भारताचे जेतेपद राखण्याचे ध्येय ; फ्रान्सविरुद्ध आज सलामीचा सामना

२०१६च्या कनिष्ठ विश्वविजेत्या संघातील तब्बल नऊ खेळाडूंनी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

विवेक प्रसाद

भुवनेश्वर : भारताच्या युवा संघाने कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद आपल्याकडेच राखण्याचे ध्येय बाळगले असून बुधवारी या गतविजेत्या संघापुढे सलामीच्या लढतीत फ्रान्सचे आव्हान असेल.

भारतीय वरिष्ठ पुरुष संघाने यंदा टोक्यो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत तब्बल ४१ वर्षांपासून असलेला पदकाचा दुष्काळ संपवताना कांस्यकमाई केली. त्यांच्याकडून प्रेरणा घेत भारताच्या युवा संघाचे सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा कनिष्ठ हॉकी विश्वचषकाचे जेतेपद पटकावण्याचे लक्ष्य असेल.

२०१६च्या कनिष्ठ विश्वविजेत्या संघातील तब्बल नऊ खेळाडूंनी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. आता ऑलिम्पिकपटू विवेक सागर प्रसादच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय कनिष्ठ हॉकी संघातील युवा खेळाडूंना वरिष्ठ संघाच्या निवडकत्र्यांचे लक्ष वेधून घेण्याची संधी लाभेल.

या युवा खेळाडूंना वरिष्ठ हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग, अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेश यांच्यासह प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यातच ही स्पर्धा भारतात होत असल्याने यजमानांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. भारताचा ‘ब’ गटात समावेश असून त्यांचे फ्रान्स (२३ नोव्हेंबर), कॅनडा (२५ नोव्हेंबर) आणि पोलंड (२७ नोव्हेंबर) यांच्याविरुद्ध साखळी सामने होतील.

संघभावना जपणे सर्वात महत्त्वाचे -मनप्रीत

विश्वचषकासारख्या स्पर्धेत तुम्हाला चढ-उतारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अपेक्षित कामगिरी होत नसल्यास एकमेकांना दोष देणे टाळून संघभावना जपा असा सल्ला भारताच्या वरिष्ठ हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतने कनिष्ठ संघातील खेळाडूंना दिला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India opening match against france in junior hockey world cup zws

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या