पीटीआय, नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतीय पुरुष संघाची सलामीची लढत तुलनेने दुबळय़ा स्पेनशी होणार आहे. हा सामना उद्घाटनाच्या दिवशी १३ जानेवारीला रुरकेला येथे नव्याने उभारलेल्या बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय मैदानावर होणार आहे. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या भारतीय संघाचा इंग्लंड, स्पेन आणि वेल्स या संघांसह ड-गटात समावेश करण्यात आला आहे. वेल्स यंदा विश्वचषक स्पर्धेत पदार्पण करणार आहे. या स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका मंगळवारी जाहीर करण्यात आली. भारताचा दुसरा सामना १५ जानेवारीला इंग्लंडशी, तर अखेरचा साखळी सामना १९ जानेवारीला वेल्सशी होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या स्पर्धेच्या अ-गटात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियासह अर्जेटिना, फ्रान्स आणि दक्षिण आफ्रिका संघांचा समावेश आहे. जगज्जेते बेल्जियम, जर्मनी, कोरिया आणि जपान हे संघ ब-गटात आहेत. क-गटात न्यूझीलंड, मलेशिया, चिली आणि नेदरलँड्स हे संघ आहेत. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी किलगा स्टेडियमवर अर्जेटिना विरुद्ध दक्षिण आफ्रिका (दु. १ वा.), ऑस्ट्रेलिया विरुद्ध फ्रान्स (दु. ३ वा.) असे सामने होणार आहेत. रुरकेला येथील नव्या मैदानावर भारताचा सामना सायंकाळी ७ वाजता होईल. या मैदानावर इंग्लंड आणि वेल्स यांच्यात सायंकाळी ५ वाजता पहिला सामना होईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India opening match against spain hockey world cup international field ysh
First published on: 28-09-2022 at 01:13 IST