भारत पाकिस्तान क्रिकेट सामना जगात कुठेही असला तरी तो पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी होते. पुढच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तानचे संघ समोरासमोर उभे ठाकणार आहेत. हा सामना १० ऑक्टोबरला जोहान्सबर्गच्या वाँडरर्स स्टेडियमवर होणार आहे. या मैदानाची प्रेक्षक क्षमता जवळपास ३५ हजार एवढी आहे. मात्र हा सामन्याचं तिकीट मिळावं अशी विनंती ८४ लाख चाहत्यांनी केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिलेल्या माहितीनुसार तिकीट बॅलटमध्ये या सामन्याच्या तिकिटासाठी ८,३९७, २९४ चाहत्यांनी आपलं नाव दिलं आहे. मैदानाच्या प्रेक्षक क्षमतेच्या तुलनेत ही संख्या प्रचंड आणि काही पटीत आहे. वर्ल्डकप फायनलच्या तिकिटासाठी ७,९००,९४४ चाहत्यांनी विनंती केली आहे. वर्ल्डकप फायनलपेक्षा भारत पाकिस्तान सामन्यासाठी चाहते आतूर आहेत.

तिकीट बॅलटला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. १९३ देशातून १२० मिलिअन चाहत्यांनी तिकिटांसाठी पसंती दर्शवली आहे. २.८ मिलिअन युनिक फॅन्सनी स्पर्धेतील सामन्यांना याचि देही याचि डोळा असू असं म्हटलं आहे.

२०२७ वर्ल्डकप दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया इथे होणार आहे. ७ ऑक्टोबरला स्पर्धेचा सलामीचा सामना होणार आहे. २०२३ वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये सहभागी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ समोरासमोर असणार आहेत.

वर्ल्डकप स्पर्धेत भारत- पाकिस्तान सामन्यांमध्ये भारताचंच वर्चस्व राहिलं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध दुरावलेले असल्याने भारतीय संघ पाकिस्तानात मालिका खेळण्यासाठी जात नाही तसंच पाकिस्तानचा संघ भारतात येत नाही. आयसीसी तसंच आशियाई क्रिकेट परिषदेतर्फे आयोजित स्पर्धांमध्ये भारत पाकिस्तान एकमेकांविरुद्ध खेळतात. २०२५ मध्ये पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं होतं. भारतीय संघाचे सामने दुबईत झाले होते.

काही महिन्यांपूर्वी युएईत झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी तसंच सपोर्ट स्टाफशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. भारतीय संघाने जेतेपदावर कब्जा केला. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसीन नक्वी यांच्या हस्ते जेतेपदाचा करंडक स्वीकारण्यास भारतीय संघाने नकार दिला होता. माझ्या हस्ते जेतेपद देण्यात येईल यावर नक्वी ठाम राहिले. तिढा न सुटल्याने भारतीय संघ जेतेपदाविनाच मायदेशी परतला.