नवी दिल्ली : पाकिस्तानशी द्विदेशीय क्रीडा संबंधांवर गेल्या वर्षी लादलेली संपूर्ण बंदी कायम राहील. मात्र, बहुराष्ट्रीय स्पर्धांसाठी सीमेपलीकडील खेळाडूंना भारतात येण्यापासून रोखले जाणार नाही, असे क्रीडा मंत्रालयाने बुधवारी स्पष्ट केले.
भारताला जागतिक ख्यातीचे क्रीडा स्थळ म्हणून प्रस्थापित करण्यासाठी खेळाडू, संघांचे अधिकारी, तांत्रिक कर्मचारी आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा नियामक मंडळाच्या पदाधिकार्यांसाठी व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. सर्व राष्ट्रीय क्रीडा महासंघ, भारतीय ऑलिम्पिक संघ आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) यांना एका परिपत्रकाद्वारे भारत- पाकिस्तान क्रीडा संबंधाबाबत सरकारचे धोरण कळविण्यात आले आहे. यामध्ये द्विपक्षीय संबंध राहणार नाहीत हे ठळकपणे नमूद करण्यात आले आहे, असे क्रीडा मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
आंतरराष्ट्रीय संबंध देखील अटी आणि शर्थींवर अवलंबून असतील असे अधोरेखित करण्यात आले आहे. त्यानुसार भारत किंवा परदेशातील बहुपक्षीय स्पर्धांच्या संदर्भात, आंतरराष्ट्रीय क्रीडा संस्थांच्या पद्धती आणि भारतीय खेळाडूंच्या हितानुसार निर्णय घेऊ, असे नमूद करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे, भारताद्वारे आयोजित बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाकिस्तानी खेळाडू आणि संघ सहभागी होऊ शकतील. यात सरकार कुठेही अडवणूक करणार नाही, असे क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
क्रिकेट सामन्यांच्या बाबतीत, बहुराष्ट्रीय स्पर्धा पाकिस्तान व्यतिरिक्त अन्य कुठेही असल्यास सरकार पाकिस्तानविरुद्ध खेळण्याच्या आड येणार नाही, असेही सांगण्यात आले आहे.
