टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यान दुबईच्या मैदानात झालेल्या सामन्यात भारताचा मानहानीकारक पराभव झाला. क्रिकेट विश्वचषकामध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानने भारताला पराभूत केलं. मात्र या विजयाचा आनंद साजरा करताना पाकिस्तानमधील क्रिकेटप्रेमी बेभान झाले आहेत. पाकिस्तानमधील अनेक शहरांमध्ये रविवारी रात्री सामना संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात आनंद साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर येऊन नाचत होते. मात्र याच आनंदोत्सवादरम्यान सेलिब्रेट्री फायरिंग म्हणजेच आनंदाच्याभरात हवेत गोळीबर करण्याचे प्रकारही घडले. मात्र या विचित्र सेलिब्रेशनमध्ये एक दोन नाही तर तब्बल १२ जण गोळी लागून जखमी झालेत.

पाकिस्तानी प्रसार माध्यमांपैकी आघाडीची वृत्तवाहिनी असणाऱ्या जियो न्यूजने स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कराची शहरात एक पोलीस उप-निरिक्षकाबरोबरच १२ जण गोळी लागल्याने जखमी झालेत. कराचीमधील ओरंजी टाउन सेक्टर चार आणि चौरांगी परिसरामध्ये अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारामध्ये गोळी लागल्याने दोन जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “गुलशन-ए-इकबालमध्ये एका तपासणीदरम्यान एक गोळी उप निरिक्षक असणाऱ्या अब्दुल गनीला लागली.” सचल गोठ, ओरंजी टाउन, न्यू कराची, गुलशन-ए-इकबाल आणि मालीर या कराचीमधील वेगवेगळ्या भागांमध्ये गोळीबार झाल्याच्या घटना घडल्या. रात्री उशीरापर्यंत अनेक भागांमध्ये लोक रस्त्यावर येऊन पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करत होते.

पाकिस्तानने भारताला १० विकेट्सने हरवल्यानंतर पाकिस्तानमधील अनेक शहरांमध्ये लोक रस्त्यावर उतरुन आनंद साजरा करत होते. काहींनी नाचून तर काहींनी फटके फोडून आनंद साजरा केला. मागील अनेक वर्षांपासून पाकिस्तानला भारताला पराभूत करता आलं नव्हतं. मात्र पहिल्यांदाच पाकिस्तानने हा पराक्रम रविवारच्या सामन्यात करुन दाखवला. सोशल नेटवर्किंगवरही पाकिस्तानी चाहत्यांनी आपल्या संघाचं तोंडभरुन कौतुक केल्याचं पहायला मिळालं.