क्रिकेट मैदानावर पाकिस्तानचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफशी हस्तांदोलनास नकार तसंच पाकिस्तानच्या मोहसीन नक्वी यांच्या हस्ते जेतेपदाचा करंडक स्वीकारण्यास भारताच्या पुरुष आणि महिला संघाने नकार दिला होता. आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॉश कोर्टवर भारत- पाकिस्तान यांच्यात मुकाबला झाला. सामना संपल्यानंतर दोन्ही खेळाडूंनी हस्तांदोलन केलं. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावर भारत-पाकिस्तान दुरावलेले असले तरी बाकी खेळांमध्ये वेगळं चित्र आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी भारताचा वीर चोटरानी आणि पाकिस्तानचा मुहम्मद इरफान यांच्यात मुकाबला झाला. वीरने पहिला गेम जिंकत चांगली सुरुवात केली. मात्र मुहम्मदने पुढचे तिन्ही गेम जिंकत सामना खिशात टाकला. दुसऱ्या गेममध्ये एका गुणावरून वीर आणि पंचांमध्ये मतभेद पाहायला मिळाला. मात्र वीर आणि मुहम्मद यांच्यात कोणतंही वैर दिसलं नाही. मुहम्मदने सरस खेळाच्या जोरावर बाजी मारली. सामना संपल्यानंतर दोघांनी हस्तांदोलन केलं आणि त्यानंतर अन्य देशांच्या खेळाडूंशीही हस्तांदोलन केलं.
काही दिवसांपूर्वीच हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय संघाने श्रीलंकेला नमवत आशिया चषकाच्या जेतेपदावर नाव कोरलं. आशियाई क्रिकेट परिषदेतर्फे या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नक्वी हे आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख आहेत. यामुळे त्यांच्या हस्ते जेतेपदाचा करंडक दिला जाणं अपेक्षित होतं. मात्र भारतीय संघाने नक्वी यांच्या हस्ते जेतेपद स्वीकारण्यास नकार दिला. अंतिम लढतीला बीसीसीआयचे सचिव देवजीत साईकिया आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला उपस्थित होते. सामन्यादरम्यान त्यांनी नक्वी यांच्याशी बातचीतही केली. सामना संपल्यानंतर भारतीय संघ पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहिला नाही. भारतीय संघ जेतेपदाविना मायदेशी परतला.
गेल्यावर्षी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने आशिया चषकाच्या जेतेपदावर नाव कोरलं. सामना संपल्यानंतर दीड तास खोळंब्याने पुरस्कार वितरण सोहळा सुरू झाला. अन्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते जेतेपद देण्याविषयी नक्वी यांना विचारण्यात आलं, मात्र त्यांनी नकार दिला. भारतीय संघही नक्वी यांच्या हस्ते जेतेपद स्वीकारणार नाही यावर ठाम राहिला. अखेर भारतीय संघ जेतेपद स्वीकारणार नाही असं निवेदक सायमन डूल यांनी जाहीर केलं. तेव्हाही भारतीय संघ जेतेपदाविना मायदेशी परतला होता.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध दुरावले आहेत. पाकिस्तानचा संघ भारतात खेळण्यासाठी येत नाही. भारतीय संघ पाकिस्तानात जात नाही. २०२५ मध्ये आशिया चषक पाकिस्तानात झाला होता. मात्र भारतीय संघाचे सामने दुबईत झाले होते.
भारताचा सूर्यकुमार यादव याने टॉसवेळी पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघा याच्याशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. सामना संपल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानचे खेळाडू तसंच सपोर्ट स्टाफ यांच्याशी हस्तांदोलन केलं नाही. आयसीसीच्या नियमानुसार हस्तांदोलन करणं अनिवार्य नसल्याने भारतीय संघावर कारवाई झाली नाही.
