देवेंद्रे पांडे | इंडियन एक्सप्रेस
India Playing XI For IND vs ZIM T20 WC: भारतीय संघाचा टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ मधील करो या मरो सामना झिम्बाब्वेविरूद्ध होणार आहे. हा सामना चेन्नईमधील एम चिदंबरम स्टेडियममध्ये काहीच वेळात खेळवला जाणार आहे. त्यापूर्वी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन बदल हे निश्चित होताना दिसतील. अक्षर पटेल तर संघात परतणार आहेच पण त्याचबरोबर अजून एक खेळाडू हा सामना खेळताना दिसेल.
सुपर-८ मधील पहिल्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेने ७६ धावांनी पराभूत केलं. यानंतर वेस्ट इंडिजने झिम्बाब्वे संघाविरूद्ध १० अधिक धावांनी विजय मिळवला. या दोन्ही निकालांमुळे भारतासाठी सेमीफायनलचं समीकरण फारच अटीतटीचं झालं आहे. टीम इंडियाला आता सेमीफायनल गाठायची असेल तर दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे झिम्बाब्वेविरूद्ध सामन्यात भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होणार आहेत.
अक्षर पटेल हा गुरुवारी चेन्नईत होणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात खेळणार असल्याची माहिती समोर आली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, ‘करो किंवा मरो’ अशा या सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन दोन बदल करण्याच्या तयारीत आहे.
रिंकू सिंहच्या जागी टीम इंडियात कोणाला संधी मिळणार?
रिंकू सिंहच्या जागी संजू सॅमसनला संधी दिली जाऊ शकते. तसेच वॉशिंग्टन सुंदरऐवजी अक्षर पटेलचा संघात समावेश होण्याची शक्यता आहे. संजू सॅमसनच्या समावेशामुळे फलंदाजीच्या क्रमात काही बदल होऊ शकतात. संघ अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांनाच सलामीला पाठवणार की सॅमसनला डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी देणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
अभिषेक शर्मा या स्पर्धेत खराब फॉर्ममध्ये आहे. त्याच्या धावा अनुक्रमे ०, ०, ० आणि १५ अशा राहिल्या आहेत. दुसरीकडे, अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मागील सुपर-८ सामन्यात अक्षर पटेलला संधी न देण्याचा निर्णय भारताला महागात पडला. त्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. त्याच वेळी रिंकू सिंहही शून्यावर बाद झाला होता. म्हणजेच, निर्णायक सामन्यापूर्वी भारतीय संघात महत्त्वाचे बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.
सुपर-८ फेरीत अजून दोन सामने बाकी असले, तरी भारताचा सामना नसलेला एक सामना त्यांच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचा ठरत आहे. तो म्हणजे दक्षिण आफ्रिका विरूद्ध वेस्ट इंडिज. चेन्नईतील झिम्बाब्वेविरुद्ध मैदानात उतरण्यापूर्वी, भारताचं लक्ष अहमदाबादमध्ये होणाऱ्या या सामन्याकडे लागलेलं असेल. या लढतीत दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला पराभूत करून भारताला मदत करावी, अशी भारतीय संघ आणि चाहत्यांची अपेक्षा असेल.

