ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यापूर्वी भारतीय संघाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील सरावात चांगलाच घाम गाळला. मात्र, ठरलेल्या वेळेत भारतीय संघ मैदानात दाखल न झाल्याने एक वेगळ्या चर्चेला उधाण आले. भारतीय सरावात अभिषेक शर्मा हा केंद्रस्थानी होता. याच मैदानावर एका वर्षापूर्वी अभिषेकने इंग्लंडविरुद्ध ५४ चेंडूंत १३५ धावांची खेळी केली होती. अभिषेकने झिम्बाब्वेविरुद्ध ५५ धावांची खेळी केली. मात्र, त्याला म्हणावी तशी लय सापडलेली नाही.
थोडा वेळ गोलंदाजी केल्यानंतर फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटकच्या मार्गदर्शनाखालील तो फलंदाजीसाठी गेला. त्याने फिरकीपटूंसमोर सरावास सुरुवात केली. ऑफ स्पिनर, लेग स्पिनर आणि अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर त्याने सराव केला. तिलक वर्मानेही अभिषेकला ऑफ स्पिन गोलंदाजी केली. निर्णायक सामन्यापूर्वी खेळपट्टीनेही सर्वांचे लक्ष वेधले. कारण, त्याच्यावर गवत पहायला मिळाले. सामन्याच्या दिवशी ते गवत कापले जाण्याची अपेक्षा आहे.
अर्शदीपने यॉर्करचा सराव केला. तर, अष्टपैलू हार्दिक पंड्याने मोठ्या फटक्यांचा जवळपास दोन तास सराव केला. तिलक आणि इशान किशन यांनी एक तासहून अधिक फलंदाजी केली. तिलकने कुलदीप यादव व वरुण चक्रवर्तीसमोर चांगले फटके मारले. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरानेही निर्णायक सामन्यासाठी मैदानात मेहनत घेतली. भारत या लढतीसाठी अंतिम अकरामध्ये बदल करण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, इंग्लंडच्या संघ दुपारी सराव केला.
चंद्रग्रहणामुळे सरावास विलंब
भारतीय क्रिकेट संघाने चंद्रग्रहणामुळे मंगळवारी संध्याकाळचा सरावाला एक तास उशिराने सुरुवात केली. भारतीय संघ सहा ते नऊ या दरम्यान सराव करणार होता. मात्र, संघ सायंकाळी सात वाजून २० मिनिटांनी मैदानात उतरला. प्रशिक्षकांचा चमू मैदानात दाखल झाला होता. मात्र, मुख्य सराव सुरू होणास विलंब झाला. स्टेडियमची ‘फ्लडलाईट’ही सहा वाजून ६० मिनिटांनी सुरू करण्यात आली होती. मात्र, ती देखील पूर्णपणे कार्यरत नव्हती. संपूर्ण संघ मैदानात उतरल्यावर त्याला कार्यरत करण्यात आले. चंद्रग्रहणामुळे एक तास उशीर झालेल्या सराव सत्रासाठी संघातील सर्व १५ सदस्य सहभागी झाले होते.
‘एमसीए’कडून क्रीडा पत्रकारांची दखल
मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेकडून (एमसीए) मुंबईतील क्रीडा पत्रकारांची दखल घेण्यात आली असून, मुंबई क्रिकेटसाठी योगदान देणाऱ्या क्रीडा पत्रकारांचा हॉनर्स बोर्ड हा करण्यात येणार आहे. वानखेडे स्टेडियम येथील बाळासाहेब ठाकरे पत्रकार कक्षात हा हॉनर्स बोर्ड असेल, अशी माहिती ‘एमसीए’चे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी दिली. आज, बुधवारी सायंकाळी चार वाजता या हॉनर्स बोर्डचे अनावरण करण्यात येईल.
