* तिसऱ्या दिवशी दोन्ही संघांचे एकंदर १७ फलंदाज बाद
* भारताला विजयासाठी ३२० धावा, तर न्यूझीलंडला ९ बळी हवेत
कसोटी क्रिकेट टिकून आहे, कारण पाच दिवसांच्या आणि चार डावांच्या खेळातील नाटय़ टिकून असल्यामुळे. याचीच प्रचिती भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाने दिली. दुसऱ्या दिवसअखेर किवींनी सामन्यावर नियंत्रण मिळवून पहिल्या कसोटीत आरामात विजय मिळवण्याचे स्वप्न पाहिले होते. परंतु शनिवारी दोन्ही संघांचे मिळून एकंदर १७ फलंदाज बाद झाले आणि ते स्वप्नही धूसर झाले. आता पहिल्या कसोटीचे दोन दिवस शिल्लक असताना दोन्ही संघांना सामना जिंकायची संधी असेल.
शनिवारी भारताने ४ बाद १३० धावसंख्येवरून आपल्या पहिल्या डावाला पुढे सुरुवात केली. परंतु रोहित शर्मा (७२) व अजिंक्य रहाणे (२६) हे मुंबईकर डावाला आकार देण्यात अपयशी ठरले आणि भारताचा डाव २०२ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर ३०१ धावांची आघाडी घेणाऱ्या न्यूझीलंडचा दुसरा डाव अनपेक्षितपणे कोलमडल्यामुळे भारतापुढे विजयासाठी ४०७ धावांचे लक्ष्य समोर उभे ठाकले आहे. भारतावर फॉलो-ऑन न लादण्याचा निर्णय यजमानांना महागात पडला. दुसऱ्या डावातही धावांचे इमले बांधण्याचे मनसुबे किवींनी आखले होते. परंतु ईडन पार्कच्या ‘बळी’दानात न्यूझीलंडचा डाव ४१.२ षटकांत व १०५ धावांत आटोपला.
न्यूझीलंडकडून रॉस टेलरने सर्वाधिक ४१ धावा केल्या. त्याने ७३ चेंडूंत ५ चौकार आणि एका षटकारासह ही खेळी साकारली. न्यूझीलंडच्या फक्त तीन फलंदाजांना धावांचे दशक गाठता आले. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (३/३८), इशांत शर्मा (३/२८) आणि झहीर खान (२/२३) या भारताच्या वेगवान माऱ्याने किवींच्या डावाला खिंडार पाडले. दिवसअखेर भारताने दुसऱ्या डावात एक बाद ८७ धावा केल्या असून, संस्मरणीय विजयासाठी त्यांना अद्याप ३२० धावांची आवश्यकता आहे.
दिवसाच्या अखेरच्या चेंडूवर ईश सोधीने सलामीवीर शिखर धवन पायचीत असल्याचे अपील केले होते, परंतु ते फेटाळण्यात आले. खेळ थांबला तेव्हा धवन आणि पुजारा अनुक्रमे ४९ आणि २२ धावांवर खेळत होते. भारताने किवींचे लक्ष्य पार केल्यास क्रिकेट इतिहासात तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च धावांचा पाठलाग करून हा विजय मिळवला जाईल.
२००३मध्ये सेंट जॉन्सवर वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४१८ धावांचे आव्हान पेलले होते. आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये चार वेळा चारशेहून अधिक धावांचे लक्ष्य चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघांना गाठता आले आहे.

मोहम्मद शमी सामना जिंकून देणारा खेळाडू आहे. भारतीय संघाला मिळालेला तो गुणवान खेळाडू आहे. चांगल्या गोलंदाजाकडे मोठय़ा प्रमाणावर बळी घेण्याची क्षमता असते. शमीकडे अशी प्रतिभा आहे. भारताला सामना जिंकून देण्यात तो निर्णायक भूमिका बजावू शकतो. सर्वच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. एकत्रित चमू म्हणून आम्ही यशस्वी ठरलो हे महत्त्वाचे आहे.
                                                       -झहीर खान

आजचा दिवस आमच्यासाठी खडतर होता. पण आम्ही दडपण घेतलेले नाही. आम्ही गोलंदाजी करताना चांगली कामगिरी केली. भारताला अडीचशे धावांच्या आत रोखत आम्ही कसोटीवर पकड मिळवली. मात्र त्यानंतर फलंदाजीत आमची घसरण झाली. दिवसाअखेरच्या स्थितीवर आम्ही समाधानी आहोत. भारताला फॉलो-ऑन न देण्याचा निर्णय योग्यच होता. गोलंदाजांना ताजेतवाने होण्याची संधी मिळाली.
-नील व्ॉगनर

धावफलक
न्यूझीलंड (पहिला डाव) :  ५०३.
भारत (पहिला डाव) : शिखर धवन झे. विल्यम्सन गो. बोल्ट ०, मुरली विजय त्रिफळा गो. वॉगनर २६, चेतेश्वर पुजारा झे. वॉटलिंग गो. बोल्ट १, विराट कोहली झे. फुल्टन गो. साऊदी ४, रोहित शर्मा त्रिफळा गो. बोल्ट ७२, अजिंक्य रहाणे झे. फुल्टन गो. साऊदी २६, महेंद्रसिंग धोनी झे. वॉटलिंग गो. वॉगनर १०, रवींद्र जडेजा नाबाद ३०, झहीर खान झे. वॉटलिंग गो. वॉगनर १४, इशांत शर्मा झे. बोल्ट गो. साऊदी ०, मोहम्मद शमी झे. फुल्टन गो. वॉगनर २, अवांतर (बाइज ५, लेगबाइज ६, वाइड ३, नोबॉल ३) १७, एकूण ६० षटकांत सर्व बाद २०२.
बाद क्रम : १-१, २-३, ३-१०, ४-५१, ५-१३८, ६-१३८, ७-१६७, ८-१८८, ९-१८९, १०-२०२.
गोलंदाजी : बोल्ट १७-२-३८-३, साऊदी १९-६-३८-३, अँडरसन ५-०-२९-०, वॉगनर ११-०-६४-४, सोधी ६-०-१३-०, विल्यम्सन २-०-९-०.
न्यूझीलंड (दुसरा डाव) : पीटर फुल्टन झे. जडेजा गो. शमी ५, हमिश रुदरफोर्ड पायचीत गो. शमी ०, केन विल्यम्सन झे. जडेजा गो. झहीर ३, रॉस टेलर झे. रहाणे गो. झहीर ४१, ब्रेन्डन मॅक्क्युलम धावचीत १, कोरे अँडरसन त्रिफळा गो. शमी २, बी. जे. वॉटलिंग त्रिफळा गो. इशांत ११, टिम साऊदी झे. पुजारा गो. जडेजा १४, ईश सोधी झे. रोहित गो. इशांत ०, नील वॉगनर झे. जडेजा गो. इशांत १५, ट्रेंट बोल्ट नाबाद ७, अवांतर (नोबॉल १, वाइड १, बाइज ४) ६, एकूण ४१.२ षटकांत सर्व बाद १०५
बाद क्रम : १-१, २-९, ३-११, ४-१५, ५-२५, ६-६३, ७-७८, ८-७८, ९-८०, १०-१०५
गोलंदाजी : शमी १२-१-३७-३, झहीर ९-२-२३-२, इशांत १०.२-३-२८-३, जडेजा ९-४-१०-१, रोहित शर्मा १-०-३-०
भारत (दुसरा डाव) : मुरली विजय झे. वॉटलिंग गो. साऊदी १३, शिखर धवन खेळत आहे ४९, चेतेश्वर पुजारा खेळत आहे २२, अवांतर (नोबॉल २, वाइड १) ३, एकूण २५ षटकांत १ बाद ८७
बाद क्रम : १-३६
गोलंदाजी : बोल्ट ६-०-२८-०, साऊदी ५-०-१८-१, वॉगनर ६-२-११-०, अँडरसन ३-०-८-०, सोधी ४-१-१७-०, विल्यम्सन १-०-५-०.