ICC Annual Rankings Update: भारतीय संघ जागतिक क्रिकेटमध्ये आपलं वर्चस्व गाजवताना दिसत आहे. टीम इंडिया टी-२० विश्वचषक २०२६ नंतर आयपीएलमध्ये व्यस्त आहे. आयपीएल २०२६ नंतरच भारतीय खेळाडू पुन्हा एकदा निळ्या किंवा पांढऱ्या जर्सीमध्ये मैदानात उतरतील. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील या विश्रांतीनंतरही, टीम इंडियाने क्रमवारीत आपले वर्चस्व कायम ठेवलं आहे.

भारतीय संघ व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे, त्याच फळ संघाला मिळालं आहे. ताज्या वार्षिक आयसीसी संघ क्रमवारीमध्ये, भारतीय संघाने एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये अव्वल स्थान कायम राखत जगाला आपली ताकद दाखवून दिली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवलं आहे.

कसोटी क्रमवारीमध्ये भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर असला तरी, मर्यादित षटकांच्या दोन्ही प्रकारांमधील त्याचे वर्चस्व हे भारतीय क्रिकेटसाठी एक मोठे यश आहे. काही दिवसांपूर्वीच कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीतील वार्षिक बदलांच्या घोषणेनंतर, आयसीसीने ११ मे रोजी एकदिवसीय क्रमवारीही जाहीर केली. दरवर्षी मे महिन्यात, आयसीसी क्रमवारी अपडेट करते, ज्यामध्ये तीन वर्षांपेक्षा जुन्या सामन्यांचे गुण पूर्णपणे वगळले जातात.

टी-२० क्रमवारीत टीम इंडिया वर्ल्ड नंबर वन

आयसीसीने जाहीर केलेल्या वार्षिक क्रमवारीत भारताने पुरुषांच्या एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखलं आहे. विशेष बाब म्हणजे, यावर्षी सलग दुसऱ्यांदा आयसीसी पुरुषांचा टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरल्यानंतर टी-२० मध्ये भारताचे वर्चस्व अधिकच मजबूत झाले आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत भारतीय संघ २७५ रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. इंग्लंड २६२ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर, तर ऑस्ट्रेलिया २५८ रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

वनडे क्रमवारीतही भारताचा दबदबा

भारताने एकदिवसीय क्रमवारीतही आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. टीम इंडियाकडे आता ११८ रेटिंग गुण आहेत, जे मागील क्रमवारीपेक्षा एका गुणाने कमी आहेत, परंतु तरीही दुसऱ्या स्थानावरील न्यूझीलंडपेक्षा संघ पाच गुणांनी पुढे आहेत. न्यूझीलंडकडे ११३ गुण आहेत, तर ऑस्ट्रेलिया १०९ गुणांसह तिसऱ्या स्थानावर कायम आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तानला मागे टाकत लक्षणीय झेप घेतली असून चौथे स्थान पटकावले आहे. श्रीलंका सहाव्या स्थानावर कायम आहे. अफगाणिस्तान, इंग्लंड, बांगलादेश आणि वेस्ट इंडिज अनुक्रमे सातव्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत.

कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाची हवा

ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमधील वर्चस्व कायम राखले आहे. ऑस्ट्रेलियन संघ १३१ रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर गतविजेता दक्षिण आफ्रिका ११९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. भारताने निश्चितच एका स्थानाची झेप घेतली असून, तो आता १०४ रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.