scorecardresearch

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा : भारताच्या लक्ष्यला उपविजेतेपद ; अंतिम सामन्यात अव्वल मानांकित अ‍ॅक्सेलसेनकडून सरळ गेममध्ये पराभूत

रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अव्वल मानांकित अ‍ॅक्सेलसेनने अप्रतिम खेळ केला.

बर्मिगहॅम : भारताचा युवा बॅडिमटनपटू लक्ष्य सेनला ऑल इंग्लंड खुल्या बॅडिमटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात डेन्मार्कच्या व्हिक्टर अ‍ॅक्सेलसेनकडून २१-१०, २१-१५ असे सरळ गेममध्ये पराभूत होऊन उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. लक्ष्य या प्रतिष्ठित स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा भारताचा पाचवा खेळाडू ठरला; पण त्याचे ही स्पर्धा जिंकणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. 

रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अव्वल मानांकित अ‍ॅक्सेलसेनने अप्रतिम खेळ केला. त्याने या सामन्याची दमदार सुरुवात करताना पहिल्या गेममध्ये ५-० अशी आघाडी घेतली. मग लक्ष्यने दोन गुणांची कमाई करत त्याची आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अ‍ॅक्सेलसेनने आपला आक्रमक खेळ सुरु ठेवत पहिला गेम २१-१० असा जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये अ‍ॅक्सेलसेनने पुन्हा आपला अनुभव पणाला लावत लक्ष्यला सर्वोत्तम खेळ करण्यापासून रोखले. या गेमच्या सुरुवातीला अ‍ॅक्सेलसेनकडे ३-० अशी आघाडी होती. यानंतर लढवय्या लक्ष्यने पुनरागमन करण्याचा प्रयत्न करताना या गेममध्ये ४-४ असा बरोबरी साधली. अ‍ॅक्सेलसेनने मात्र पुन्हा खेळ उंचावला आणि सलग गुण मिळवत ८-५ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या गेमच्या विश्रांतीपर्यंत अ‍ॅक्सेलसेन ११-५ अशा मजबूत स्थितीत होता. विश्रांतीनंतर लक्ष्यने काही गुणांची कमाई करत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला अ‍ॅक्सेलसेनने सातत्याने गुण मिळवण्याची संधी दिली नाही. अ‍ॅक्सेलसेनने आपली आघाडी १५-१० अशी भक्कम केली. यानंतर त्याने उत्कृष्ट खेळ सुरू ठेवला आणि दुसरा गेम २१-१५ असा जिंकत जेतेपदाला गवसणी घातली.

महिला एकेरीत यामागूची अजिंक्य

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात जपानच्या अकाने यामागूचीने आन सेयंगला २१-१५, २१-१५ असे सरळ गेममध्ये नमवत ऑल इंग्लंड खुल्या बॅडिमटन स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले.

ऑल इंग्लंड स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवणारा लक्ष्य हा तिसरा भारतीय बॅडिमटनपटू ठरला आहे. त्याच्याआधी प्रकाश नाथ (१९४७) आणि सायना नेहवाल (२०१५) यांनी ही दमदार कामगिरी केली होती. तसेच दोन भारतीय खेळाडूंनी ही स्पर्धा जिंकली आहे.  

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India s lakshya sen defeats by viktor axelsen in german open 2022 zws

ताज्या बातम्या