लंडन : नवी दिल्ली स्थित ‘स्लम सॉकर’ या फुटबॉल प्रकल्पाला या वर्षीच्या प्रतिष्ठेच्या लॉरेओ जागतिक क्रीडा पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले आहे.
खेळांच्या माध्यमातून गरजू मुले आणि युवकांचे आयुष्य बदलण्यात साहाय्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना प्रोत्साहन देणे हा ‘लॉरेओ स्पोर्ट्स फॉर गुड’ पुरस्काराचा हेतू आहे. या पुरस्कारासाठी ‘स्लम सॉकर’सह अन्य चार व्यक्ती/संस्थांना नामांकन मिळाले आहे. राजधानी दिल्ली येथील झोपडपट्टय़ांमध्ये राहणाऱ्या मुलांना शिक्षित करणे आणि त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढणे हा ‘स्लम सॉकर’ प्रकल्पाचा उद्देश आहे.
लॉरेओ वर्षांतील सर्वोत्तम पुरुष खेळाडूच्या पुरस्कारासाठी विश्वचषक विजेत्या अर्जेटिना फुटबॉल संघाचा कर्णधार लिओनेल मेसी, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हॅट्ट्रिकसह ‘गोल्डन बॉल’ पुरस्कार मिळवणारा फ्रान्सचा तारांकित फुटबॉलपटू किलियन एम्बापे, ‘फॉम्र्युला १’ विजेता मॅक्स व्हेस्र्टापेन, टेनिसपटू राफेल नदाल, पोल वॉल्टपटू मोंडो डुप्लान्टिस आणि बास्केटबॉलपटू स्टेफ करी यांना नामांकन मिळाले आहे.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चमक दाखवणाऱ्या अमेरिकेच्या धावपटू शेली-अॅन फ्रेझर-प्राइस आणि सिडनी मॅक्लॉक्न-लेव्हरोन यांच्यासह जलतरणपटू केटी लडेकी, फुटबॉलपटू अलेक्सिया पुतेयास, स्किंगपटू मिकाएला शिपरीन आणि टेनिसपटू इगा श्वीऑनटेक यांना लॉरेओ वर्षांतील सर्वोत्तम महिला खेळाडूच्या पुरस्कारासाठी मानांकन देण्यात आले आहे. तसेच विश्वचषक विजेता अर्जेटिना फुटबॉल संघ, चॅम्पियन्स लीग विजेता रेयाल माद्रिद संघ, ‘एनबीए’ विजेता गोल्डन स्टेट वॉरियर्स संघ, ‘फॉम्र्युला १’मधील ओरॅकल रेड बूल रेसिंग संघ, फ्रान्स रग्बी संघ आणि इंग्लंड महिला फुटबॉल संघ हे लॉरेओ वर्षांतील सर्वोत्तम संघाच्या पुरस्कारासाठी शर्यतीत आहेत.