scorecardresearch

भारत विद्यालयाचा विद्यार्थी क्रिकेट संघ राज्यस्तरावर

चुरशीच्या लढतीत बुलढाण्याच्या भारत विद्यालयाच्या संघाने धामणगाव संघावर १८ धावांनी मात करून विभागीय क्रिकेट स्पध्रेचे अजिंक्यपद पटकावले.

चुरशीच्या लढतीत बुलढाण्याच्या भारत विद्यालयाच्या संघाने धामणगाव संघावर १८ धावांनी मात करून विभागीय क्रिकेट स्पध्रेचे अजिंक्यपद पटकावले. त्यामुळे आता या संघातील खेळाडूंना राज्यस्तरावर खेळण्याची संधी मिळाली आहे.
एचव्हीपीएमच्या क्रिकेट मैदानात मॅटवर खेळवण्यात आलेल्या या स्पध्रेत बुलढाण्याच्या खेळाडूंनी सर्वच आघाडय़ांवर दमदार कामगिरी केली. संघाने पहिला सामना अकोला, दुसरा अमरावती, तर अंतिम धामणगाव रेल्वे संघाबरोबर खेळला. धामणगावच्या संघाबरोबर फलंदाजी करतांना बुलढाण्याने १० षटकात एका फलंदाजाच्या मोबदल्यात ८२ धाव उभारल्या.
अभिषेक पालकरने एक बाजू सांभाळून ३० चेंडूत सहा सीमापार फटक्यांसह ४७ धावांची आकर्षक खेळी केली. शशांक अगवालने २० चेंडूत एका चौकारासह १६ धावांची खेळी करून त्याला सुरेख सहकार्य केले.
धामणगावच्या सेठ फत्तेलाल कला आणि वाणिज्य विद्यालयाला बुलढाण्याने १० षटकांत ६ बाद ६४ धावात रोखले. गौरंग देशपांडेने १९ चेंडूत सावध प्रतिकार करताना केवळ १ चौकार ठोकून २२ धावा फडकावल्या. जय कपिलेने ६ चेंडूत १२ धावांची सुरेख खेळी केली. बुलढाण्याचा गोलंदाज हषीकेशकडून दोन षटकात सहा धावात चार फलंदाज टिपले, तर शशांकनेही केवळ एका षटकात चार धावात दोन फलंदाजांचा बळी घेतला. अगोदरच्या सामन्यात बुलढाण्याने अमरावतीवर १७ धावांनी मात करून अंतिम फेरीत धडक दिली होती.
संघात अभिषेक पालकर, शशांक अग्रवाल, प्रज्वल काळे, प्रतीक काकडे, अमृत तारकसे, मयूर पिसे, जतीन पाटील, ह्रषीकेश जाधव, तेजस बर्दे, आदित्य देवल, अनिमेश नागवंशी, रोहित जोगळेकर, रोहित पवार, शुभंम सूर्यवंशी, ऋत्विक राठोड, उदय इंगळे यांचा समावेश होता. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन आगाशे, मुख्याध्यापक विलास देशमुख, शालिग्राम उन्हाळे व संघाचे मार्गदर्शक संजय देवल, वैभव वाघमारे यांनी त्यांचे स्वागत केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-09-2013 at 12:33 IST

संबंधित बातम्या