ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या यशामुळे भारताने गाफील न राहता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अधिक जोमाने तयारी करावी. विशेषत: त्यांनी इंग्लंडला किंचितही कमी लेखू नये, असा सल्ला भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज किरण मोरे यांनी दिला आहे.

भारत-इंग्लंड यांच्यातील बहुप्रतीक्षित कसोटी मालिकेला ५ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार असून यापूर्वी २०१६-१७च्या भारत दौऱ्यात इंग्लंडला ०-४ असा पराभव पत्करावा लागला होता. २०१२मध्ये मात्र इंग्लंडने भारताला २-१ असे पराभूत केले होते. त्यामुळे ५८ वर्षीय मोरे यांनी भारताला सावधानतेचा इशारा दिला आहे.

‘‘आयसीसी क्रमवारीत इंग्लंडचा संघ तूर्तास चौथ्या स्थानी असला तरी कोणत्याही संघाला त्यांच्याच भूमीत हरवण्याची इंग्लंडमध्ये क्षमता आहे. भारताने ऑस्ट्रेलियात केलेली कामगिरी वाखाणण्याजोगीच आहे. परंतु म्हणून मायदेशात खेळताना त्यांनी इंग्लंडला कमी लेखू नये,’’ असे मोरे म्हणाले.

‘‘कोणत्याही मालिकेसाठी इंग्लंडचा संघ नेहमीच पूर्ण तयारीनिशी येतो. प्रमुख खेळाडूंवरील खेळाच्या ताणाचे ते योग्य व्यवस्थापन करतात. श्रीलंकेविरुद्ध बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर यांच्या अनुपस्थितीत त्यांनी दमदार कामगिरी केली. आता त्यांचेही पुनरागमन झाले आहे. त्याशिवाय जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्या रूपात इंग्लंडकडे सर्वोत्तम वेगवान जोडी आहे. त्यामुळे ही मालिका फारच रंगतदार होईल,’’असेही मोरे यांनी सांगितले.

आजपासून खेळाडूंचा सराव

भारत-इंग्लंड या दोन्ही संघांतील सर्व खेळाडूंच्या तिन्ही करोना चाचण्यांचा अहवाल नकारात्मक आल्याने मंगळवारपासून त्यांना सरावाला प्रारंभ करण्याची मुभा देण्यात आली आहे. दुपारी २ ते ५ वेळेत इंग्लंडच्या खेळाडूंना सराव करता येणार आहे.

प्रसारण हक्काच्या शर्यतीत चॅनेल-४ अग्रेसर

लंडन : भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचे टीव्हीवर थेट प्रक्षेपण करण्यासाठी विदेशातील क्रीडा वाहिन्यांमध्ये अद्यापही संघर्ष सुरू असून सध्या चॅनेल-४ समुह या शर्यतीत अग्रेसर आहे. लंडनमधील एका नामांकित वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार इंग्लंडमधील बीटी स्पोर्ट्स आणि स्कार्य स्पोर्ट्स यांच्यात करारावरून झालेल्या मतभेदांमुळे यंदा १५ वर्षांनंतर प्रथमच चॅनेल-४ वर एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्याचे थेट प्रक्षेपण होऊ शकते. उभय संघांतील कसोटी मालिकेला शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे.