पीटीआय, गुवाहाटी : प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या दुखापतीमुळे भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. तरीही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवारी होणाऱ्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात आपली लय कायम ठेवत मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. पाठीच्या दुखापतीमुळे बुमरा ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळण्याबाबत साशंकता आहे. विश्वचषकापूर्वी संघाच्या तयारीच्या दृष्टीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बुमराच्या अनुपस्थितीमुळे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मासमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.

आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांना भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे, पण हे दोघे विश्वचषकाच्या संघात नाहीत. बुमराच्या जागी संघात समावेश करण्यात आलेल्या सिराजला पुरेशी संधी देण्याचे आव्हानही संघ व्यवस्थापनासमोर असणार आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची विश्वचषक स्पर्धेसाठी राखीव खेळाडू म्हणून भारतीय संघात निवड झाली आहे. मात्र, तो नुकताच करोनामुक्त झाल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला नाही. दुसरीकडे, आफ्रिकेचे फलंदाज पहिल्या सामन्यात अपयशी ठरले. त्यामुळे मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी त्यांच्या कामगिरीत सुधारणा गरजेची आहे. कॅगिसो रबाडा आणि आनरिख नॉर्किएसारखे चांगले वेगवान गोलंदाज दक्षिण आफ्रिकेकडे आहेत. त्यांच्यापासून भारताला सावध रहावे लागेल.

चहर, अर्शदीपकडून अपेक्षा

बुमराची दुखापत आणि भुवनेश्वर कुमारची विश्रांती यामुळे आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दीपक चहरला संधी मिळत असून विश्वचषक स्पर्धेसाठी तो राखीव खेळाडू आहे. तिरुवनंतरपूरम येथे झालेल्या पहिल्या सामन्यात चहर आणि युवा अर्शदीप सिंगच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेची फलंदाजांची फळी कोलमडली होती. त्यामुळे भारताने विजय नोंदवत मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. आता याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. हर्षल पटेलनेही पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली. त्याचा आता कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न असेल. सिराज आणि उमेशला या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. रवींद्र जडेजाच्या दुखापतीनंतर संघात स्थान मिळालेल्या अक्षर पटेलने आपली निवड साध्य करीत चमकदार कामगिरी केली.

आघाडीच्या फलंदाजांकडे नजरा

विश्वचषकापूर्वी विराट कोहलीसह भारताच्या आघाडीच्या चार फलंदाजांना लय सापडल्याचे दिसते आहे. केएल राहुलने पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर त्याचा आत्मविश्वास दुणावला असेल. मधल्या फळीत ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिकसारख्या फलंदाजांना पुरेशी संधी मिळालेली नाही. पंतला आशिया चषक स्पर्धेतून परतल्यानंतर फलंदाजी मिळालेली नाही, तर कार्तिकने गेल्या सात सामन्यांत केवळ नऊ चेंडूंचा सामना केला आहे.

  • वेळ : सायं. ७ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी