पीटीआय, कटक : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेतील रविवारी होणाऱ्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात पुनरागमन करण्यासाठी भारतीय संघाला गोलंदाजीच्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल. याचप्रमाणे कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात प्रथमच नेतृत्व करताना पंत अपयशी ठरला. भारताचे २१२ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य डेव्हिड मिलर आणि रासी व्हॅन डर डसन यांच्या फलंदाजीमुळे आफ्रिकेने सहज पेलत मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली.

पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सचा संघ इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) बाद फेरी गाठण्यात अपयशी ठरला. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील भावी कर्णधाराचा शोध घेतला जात असताना पंत या शर्यतीत अनपेक्षितपणे मागे पडला आहे. ‘आयपीएल’मध्ये गुजरात टायटन्सला पहिल्याच हंगामात जेतेपद जिंकून देणाऱ्या हार्दिक पंडय़ाने आपली दावेदारी भक्कम केली आहे. अष्टपैलू वेगवान गोलंदाज ही उपयुक्तताही त्याने सिद्ध केली आहे. ‘आयपीएल’मधील उपविजेत्या राजस्थान रॉयल्सकडून खेळताना ‘पर्पल कॅप’ जिंकणाऱ्या फिरकी गोलंदाज यजुर्वेद्र चहलला पहिल्या सामन्यात दोनच पूर्ण षटके वाटय़ाला आली. यावरूनही पंतवर टीका झाली.

अर्शदीप की उमरान?

अनुभवी भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि युवा आवेश खान या वेगवान गोलंदाजांना आपला प्रभाव दाखवता आला नाही. या तिघांपैकी आवेशने कमी धावा दिल्या. चौथा वेगवान गोलंदाज हार्दिकसुद्धा अयशस्वी ठरला. त्याने एकाच षटकात १८ धावा दिल्या. त्यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी अर्शदीप सिंग किंवा उमरान मलिकपैकी एकाला संधी मिळू शकते. फलंदाजीत नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या अनुपस्थितीत इशान किशनने ७६ धावा करताना ऋतुराज गायकवाडसह ५७ धावांची सलामीसुद्धा दिली. मग श्रेयस अय्यर, पंत आणि हार्दिक पंडय़ा यांच्या आतषबाजीमुळे भारताला दोनशे धावांचा टप्पा ओलांडता आला.

मिलर, डसनवर भिस्त

‘आयपीएल’मधील यशाची पुनरावृत्ती आफ्रिकेच्या खेळाडूंनी भारतीय भूमीवर मालिकेतसुद्धा केली. गुजरातच्या विजयाचा शिल्पकार ठरणाऱ्या मिलरने ‘आयपीएल’मध्ये ४८१ धावा केल्या होत्या. दिल्लीच्या मैदानावर त्याने आक्रमक फलंदाजीचा प्रत्यय घडवला. लखनऊ सुपर जायंट्सकडून ५०८ धावा करणाऱ्या क्विंटन डीकॉकला (२२) चांगल्या सुरुवातीचे मोठय़ा खेळीत रूपांतर करता आले नाही. डसनने नाबाद ७५ धावा करीत आपली भूमिका चोख बजावली. आफ्रिकेच्या गोलंदाजीची मदार कॅगिसो रबाडा व आनरिख नॉर्कीए यांच्यावर आहे.

संघ

भारत : ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पंडय़ा, वेंकटेश अय्यर, यजुर्वेद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्शल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

दक्षिण आफ्रिका : टेंबा बव्हुमा (कर्णधार), क्विंटन डीकॉक (यष्टीरक्षक), रीझा हेन्ड्रिक्स, हेन्रिच क्लासन, केशव महाराज, एडिन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, आनरिख नॉर्किए, वेन पार्नेल, ड्वेन प्रीटोरियस, कॅगिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्ज, रासी व्हॅन डर डसन, मार्को यान्सेन.

  •   वेळ : सायं. ७ वा.
  •   थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी