IND vs AFG India Squad for T20I Series: भारताचा टी-२० संघ पुढील महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध ३ सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. झिम्ब्बावेविरूद्ध टी-२० मालिकेसाठी संजू सॅमसनला भारताच्या संघातून वगळण्यात आलं होतं. आता आगामी मालिकेसाठी त्याला पुन्हा संधी देण्यात आली आहे. पाहूया भारतीय संघ नेमका कसा आहे.
भारतीय संघ घरच्या मैदानावर या मालिकेसाठी पाहुणा संघ असणार आहे. अफगाणिस्तान संघाकडे या मालिकेचं यजमानपद आहे आणि मालिकेतील तिन्ही सामने दिल्लीत खेळवले जातील. श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर ही मालिका खेळवली जाणार आहे. १३ सप्टेंबरपासून या टी-२० मालिकेला सुरूवात होईल. त्यानंतर १५ सप्टेंबरला दुसरा आणि १७ सप्टेंबरला तिसरा सामना खेळवला जाईल. श्रेयस अय्यरच्या खांद्यावर संघाची धुरा असणार आहे. तर तिलक वर्माकडे संघाचं उपकर्णधार पद आहे.
भारताच्या टी-२० संघात कोणकोणाला मिळाली संधी?
अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशीची स्फोटक जोडी मालिकेत डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी स्वीकारू शकतात. दरम्यान, निवडकर्त्यांनी संजू सॅमसन आणि इशान किशन या दोन्ही यष्टिरक्षक-फलंदाजांना संघात कायम ठेवलं आहे. याव्यतिरिक्त, अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे आणि अक्षर पटेल यांची, तसेच वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई या फिरकीपटूंच्या जोडीची निवड करण्यात आली आहे. याशिवाय दुखापतीशी झुंज देणाऱ्या ४ खेळाडूंचा संघात समावेश केला आहे.
१५ सदस्यांच्या या संघात चार प्रमुख खेळाडूंची निवड ही त्यांच्या तंदुरुस्तीच्या अटीवर करण्यात आली आहे; तंदुरुस्तीबाबतची मंजुरी मिळाल्यानंतरच या मालिकेत त्यांचा सहभाग निश्चित केला जाईल. या चार खेळाडूंमध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी, फिरकी गोलंदाज व अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा यांचा समावेश आहे. हे चौघेही सध्या दुखापतींशी झुंज देत आहेत, त्यामुळे त्यांच्या सहभागाबाबतचा निर्णय ऐनवेळी घेतला जाईल.
भारताचा अफगाणिस्तानविरूद्ध टी-२० मालिकेसाठी संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा
