India T20 Squad Announced for IND vs SA Series: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. कसोटी आणि वनडे मालिकेनंतर सर्वांच्या नजरा टी-२० मालिकेसाठी संघ कसा असणार यावर होत्या. आता टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर संघाची धुरा असणार आहे. टी-२० विश्वचषक २०२६ च्या दृष्टीने ही पाच सामन्यांची मालिका महत्त्वाची असणार आहे.
दोन्ही संघांमधील एकदिवसीय मालिका संपल्यानंतर ९ डिसेंबरपासून कटकमध्ये टी-२० मालिकेला सुरूवात होईल. तर अखेरचा सामना १९ डिसेंबरला अहमदाबादमध्ये खेळवला जाईल. शुबमन गिलला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कसोटी सामन्यात मानेला दुखापत झाली होती, यानंतर तो कसोटी व वनडे मालिकेतून बाहेर पडला होता. तर टी-२० मालिकेपूर्वी शुबमन गिल पूर्णपणे फिट झाल्यास त्याची प्लेईंग इलेव्हनमध्ये निवड केली जाईल. बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समधून गिलचं फिटनेस प्रमाणपत्र मिळण्यावर त्याचं खेळण अवलंबून असल्याचं बीसीसीआयने सांगितलं आहे.
सूर्यकुमार यादव संघाचं नेतृत्त्व करणार आहे. भारताचा टी-२० संघ जेमतेम सारखाच आहे. ऋषभ पंत दुखापतीतून सावरल्यानंतरही टी-२० मालिकेसाठी त्याची संघात निवड करण्यात आलेली नाही. यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसन व जितेश शर्मा यांची निवड करण्यात आलेली आहे. याशिवाय अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे हे खेळाडू कायम आहेत. तर दुखापतीनंतर हार्दिक पंड्या भारताच्या टी-२० संघात परतला आहे.
गोलंदाजी विभागात वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग व हर्षित राणा आहेत, तर अष्टपैलू म्हणून दुबे व पंड्या असतील. तर फिरकीमध्ये कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती व वॉशिंग्टन सुंदर असतील. तर फिनिशरच्या भूमिकेत असणाऱ्या रिंकू सिंहची या संघात निवड करण्यात आलेली नाही.
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार)*, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (उपकर्णधार), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर
