नवी दिल्ली : आगामी युवा (१९ वर्षांखालील) आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा आयुष म्हात्रेकडेच सोपविण्यात आली आहे. एकदिवसीय प्रारूपातील ही स्पर्धा १२ ते २१ डिसेंबर या कालावधीत दुबई येथे रंगणार आहे.
तडाखेबंद फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीलाही या संघात स्थान मिळाले आहे. म्हात्रे आणि सूर्यवंशी सलामीला खेळणे अपेक्षित आहे. म्हात्रेने यापूर्वी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही भारताच्या युवा संघाचे नेतृत्व केले होते. पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे युवा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने आशिया चषकाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
आशिया चषकात भारतीय संघ सलामीची लढत १२ डिसेंबरला खेळणार आहे. प्रतिस्पर्धी संघ पात्रता फेरीच्या निकालांनंतर ठरेल. भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी १४ डिसेंबरला आमनेसामने येतील. भारतीय संघ तिसरा साखळी सामना १६ डिसेंबरला पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या संघाविरुद्धच खेळेल. या स्पर्धेच्या उपांत्य लढती १९ डिसेंबरला होतील, तर अंतिम लढत २१ डिसेंबरला खेळवली जाणार आहे.
संघ : आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), अभिज्ञान कुंडू, हरवंश सिंग (दोघे यष्टिरक्षक), वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी, युवराज गोहिल, कनिष्क चौहान, खिलान पटेल, नमन पुष्पक, डी. दीपेश, हेनिल पटेल, किशन कुमार सिंह, उदय मोहन, आरोन जॉर्ज.
राखीव खेळाडू : राहुल कुमार, जे. हेमचुदेशन, बीके किशोर, आदित्य रावत.
