पालेकेले : स्मृती मानधना (८३ चेंडूंत नाबाद ९४ धावा) आणि शफाली वर्मा (७१ चेंडूंत नाबाद ७१) या सलामीच्या जोडीच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारतीय महिला संघाने दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर १० गडी राखून मात केली. 

श्रीलंकेने दिलेले १७४ धावांचे लक्ष्य भारताने २५.४ षटकांत एकही गडी न गमावता पूर्ण करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. तसेच महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकही गडी न गमावता धावांचा यशस्वी पाठलाग करताना कोणत्याही संघाची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.

त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव ५० षटकांत १७३ धावांवर आटोपला. त्यांच्याकडून अमा कंचना (नाबाद ४७), निलाक्षी डीसिल्वा (३२) आणि कर्णधार चमारी अटापट्टू (२७) यांनी चांगली फलंदाजी केली. भारताची मध्यमगती गोलंदाज रेणुका सिंगने (४/२८) भेदक मारा करताना श्रीलंकेच्या फलंदाजांना अडचणीत टाकले.

संक्षिप्त धावफलक 

श्रीलंका : ५० षटकांत सर्व बाद १७३ (अमा कंचना नाबाद ४७, निलाक्षी डीसिल्वा ३२; रेणुका सिंग ४/२८, दीप्ती शर्मा २/३०) पराभूत वि. भारत : २५.४ षटकांत बिनबाद १७४ (स्मृती मानधना नाबाद ९४, शफाली वर्मा नाबाद ७१)

सामनावीर : रेणुका सिंग