श्रीलंकेचा तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात सात गडी राखून विजय

सलग दुसऱ्या लढतीत फलंदाजांनी केलेल्या सुमार कामगिरीमुळे भारतीय संघावर मालिका पराभवाची नामुष्की ओढवली. फिरकीपटू वानिंदू हसरंगाने (४ बळी आणि नाबाद १४ धावा) दिलेल्या अष्टपैलू योगदानाच्या बळावर श्रीलंकेने तिसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात भारताचा सात गडी आणि ३३ चेंडू राखून धुव्वा उडवला.

भारताने दिलेले ८२ धावांचे माफक लक्ष्य गाठताना श्रीलंकेची प्रारंभी दमछाक झाली. मात्र धनंजया डीसिल्व्हा (नाबाद २३) आणि हसरंगा यांनी चौथ्या गड्यासाठी २६ धावांची भर घालून श्रीलंकेला १४.३ षटकांत विजय मिळवून दिला. या विजयासह श्रीलंकेने ट्वेन्टी-२० मालिकेत २-१ असे यश संपादन केले. फिरकीपटू राहुल चहरने भारतातर्फे तीन बळी मिळवले. परंतु अन्य गोलंदाजांकडून त्याला पुरेशी साथ लाभली नाही.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना फिरकी गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. कर्णधार शिखर धवन (०) पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. या धक्क्यातून भारतीय संघ अखेरपर्यंत सावरूच शकला नाही. त्यातच संघातील बहुतांश फलंदाज विलगीकरणामुळे या सामन्याला मुकल्याने भारताला पाच प्रमुख फलंदाजांसह खेळावे लागले.

हसरंगाचे गोलंदाजीसाठी आगमन होताच भारताची फलंदाजी ढेपाळली. हसरंगाने ऋतुराज गायकवाड (१४), संजू सॅमसन (०), भुवनेश्वर कुमार (१६) आणि वरुण चक्रवर्ती (०) यांचे बळी मिळवले. परंतु कुलदीप यादवने (नाबाद २३) अखेरपर्यंत झुंज दिल्यामुळे भारताने २० षटकांत जेमतेम ८१ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून या लढतीसाठी जायबंदी नवदीप सैनीऐवजी संदीप वॉरिअरला पदार्पणाची संधी देण्यात आली.

संक्षिप्त धावफलक

भारत : २० षटकांत ८ बाद ८१ (कुलदीप यादव नाबाद २३, भुवनेश्वर कुमार १६; वानिंदू हसरंगा ४/९, दसून शनाका २/२०) पराभूत वि. श्रीलंका : १४.३ षटकांत ३ बाद ८२ (धनंजया डीसिल्व्हा नाबाद २३, वानिंदू हसरंगा नाबाद १४; राहुल चहर ३/१५)

’ सामनावीर आणि मालिकावीर : वानिंदू हसरंगा