scorecardresearch

भारत-श्रीलंका ट्वेन्टी-२० मालिका : भारतीय महिला संघाचा पराभव; श्रीलंका सात गडी राखून विजयी; अटापट्टूचे अर्धशतक

कर्णधार चमारी अटापट्टूच्या (४८ चेंडूंत नाबाद ८० धावा) आक्रमक अर्धशतकी खेळीमुळे श्रीलंकेने सोमवारी तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात भारतावर सात गडी राखून विजय मिळवला.

sp chamira attapattu
संग्रहित छायाचित्र

डाम्बुला : कर्णधार चमारी अटापट्टूच्या (४८ चेंडूंत नाबाद ८० धावा) आक्रमक अर्धशतकी खेळीमुळे श्रीलंकेने सोमवारी तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात भारतावर सात गडी राखून विजय मिळवला. मात्र या निकालानंतरही भारताने पहिले दोन्ही सामने जिंकल्याने या मालिकेत २-१ अशी बाजी मारली.

भारताने दिलेले १३९ धावांचे आव्हान यजमान श्रीलंकेने १७ षटकांतच पूर्ण केले. अटापट्टूला हर्षिता समरविक्रमाची (१३) साथ लाभली.  हर्षिताला राधा यादवने बाद केल्यानंतर अटापट्टूने श्रीलंकेच्या डावाची सुत्रे आपल्या हाती घेतली. तिने नाबाद ८० धावांच्या खेळीत १४ चौकार व एक षटकार लगावला. अटापट्टूने नीलाक्षी डिसिल्वासोबत (३०) तिसऱ्या गडय़ासाठी ७७ धावांची भागिदारी रचत संघाचा विजय साकारला.

त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने २० षटकांत ५ बाद १३८ अशी धावसंख्या उभारली. सलामीवीर स्मृती मानधना (२२) आणि एस. मेघना (२२) यांनी भारताचा डाव सावरला. या दोघी माघारी परतल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर (नाबाद ३९) आणि पहिल्या सामन्यात चमक दाखवणारी जेमिमा रॉड्रिग्ज (३३) यांच्या योगदानामुळे भारताने १३० धावांचा टप्पा ओलांडला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India sri lanka twenty20 series india lose final sri lanka win atapattu half century ysh

ताज्या बातम्या