पीटीआय, डाम्बुला : मालिका विजयासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाला शनिवारी दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात श्रीलंकेचा सामना करण्यासाठी आघाडीच्या फलंदाजी फळीच्या कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे. भारताने गुरुवारी पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात ३४ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिका जिंकण्यासाठी कमकुवत दुव्यांवर मेहनत घेण्याचा भारताचा प्रयत्न असेल. आगामी बर्मिगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ट्वेन्टी-२० महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला असून या मालिकेच्या माध्यमातून भारताला उत्तम सराव मिळणार आहे.

भारताने पहिला  सामना जिंकला असला, तरीही फलंदाजांना यामध्ये चमक दाखवता आली नाही. शफाली वर्मा (२२ धावा), कर्णधार हरमनप्रीत कौर (२२ धावा) आणि रिचा घोष (११ धावा) यांना चांगल्या सुरुवातीचे मोठय़ा खेळीत रूपांतर करता आले नाही. मितालीचा विक्रम मोडीत काढण्यासाठी हरमनप्रीतला २४ धावांची आवश्यकता आहे. उपकर्णधार स्मृती मानधना आणि एस. मेघना यांच्याकडून या लढतीत उत्तम खेळीची अपेक्षा असणार आहे.

गोलंदाजांनी भारताच्या मागील विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. राधा (२/२२), दीप्ती (१/९) आणि शफाली (१/१०) या फिरकीपटूंनी धिम्या खेळपट्टीवर चमक दाखवली होती. यजमान संघाला त्यांच्या चमारी अटापट्टू, विश्मी गुणरत्ने, हर्षिता मडवी व नीलाक्षी डीसिल्वा यांच्याकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा असेल.

’ वेळ : दुपारी २:०० वा.

’ थेट प्रक्षेपण : फॅनकोड अ‍ॅप