पीटीआय, डाम्बुला : कर्णधार हरमनप्रीत कौरची (नाबाद ३१ धावा व १ बळी) अष्टपैलू कामगिरी आणि सलामीवीर स्मृती मानधनाच्या (३४ चेंडूंत ३९ धावा) अप्रतिम फलंदाजीच्या बळावर भारतीय महिला संघाने शनिवारी दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर पाच गडी व पाच चेंडू राखून मात केली. यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

डाम्बुला येथे झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने दिलेले १२६ धावांचे आव्हान भारताने १९.१ षटकांत पूर्ण केले. स्मृती आणि शफाली वर्मा (१० चेंडूंत १७) यांनी भारताच्या डावाची आक्रमक सुरुवात केली. या दोघींनी ३.४ षटकांत ३० धावांची सलामी दिल्यावर शफालीला ओशादी रणसिंघेने माघारी धाडले. एस. मेघानाही (१० चेंडूंत १७) काही चांगले फटके मारून बाद झाली. यानंतर स्मृती आणि कर्णधार हरमनप्रीत यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ३८ धावांची भागिदारी रचली. स्मृतीने ३४ चेंडूंत आठ चौकारांसह ३९ धावा केल्यावर तिला इनोका रणवीराने बाद केले. मग हरमनप्रीतने डावाची सुत्रे आपल्या हातात घेतली आणि अखेरच्या षटकात भारताला जिंकवून दिला. यास्तिका भाटिया (१३) आणि दीप्ती शर्मा (नाबाद ५) यांनी तिला काहीशी साथ दिली. गेल्या लढतीतील सामनावीर जेमिमा रॉड्रिग्जला (३) फारशी चमक दाखवता आली नाही.

त्यापूर्वी, विश्मी गुणरत्ने (५० चेंडूंत ४५) आणि कर्णधार चमारी अटापट्टू (४१ चेंडूंत ४३) यांच्या खेळींमुळे श्रीलंकेने २० षटकांत ७ बाद १२५ अशी धावसंख्या उभारली. या दोघींचा अपवाद वगळता श्रीलंकेची एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या करू शकली नाही.

संक्षिप्त धावफलक 

श्रीलंका : २० षटकांत ७ बाद १२५ (विश्मी गुणरत्ने ४५, चमारी अटापट्टू ४३; दीप्ती शर्मा २/३४, हरमनप्रीत कौर १/१२) पराभूत वि. भारत : १९.१ षटकांत ५ बाद १२७ (स्मृती मानधना ३९, हरमनप्रीत कौरच्या नाबाद ३१; ओशादी रणसिंघे २/३२)

सामनावीर : हरमनप्रीत कौर