scorecardresearch

भारत-श्रीलंका ट्वेन्टी-२० मालिका : दावेदारांची चाचपणी! ; भारत-श्रीलंका यांच्यात आज पहिला ट्वेन्टी-२० सामना

ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारताची संघरचना कशी असावी, हे निश्चित झाले असून आता आम्ही त्या दृष्टीने पर्यायी खेळाडू शोधणार आहोत, अशी प्रतिक्रिया मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली.

लखनऊ : ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारताची संघरचना कशी असावी, हे निश्चित झाले असून आता आम्ही त्या दृष्टीने पर्यायी खेळाडू शोधणार आहोत, अशी प्रतिक्रिया मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध गुरुवारी रंगणाऱ्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात संघातील स्थानासाठी दावेदारी पेश करण्याची संधी भारतीय खेळाडूंना मिळणार आहे.

भारत-श्रीलंका यांच्यात तीन ट्वेन्टी-२० लढती होणार असून त्यानंतर उभय संघांत दोन कसोटीही खेळवण्यात येणार आहेत. रोहित शर्माने कर्णधारपद स्वीकारल्यापासून भारत ट्वेन्टी-२० प्रकारात अपराजित असल्याने श्रीलंकेविरुद्धही भारताचेच पारडे जड मानले जात आहे. नोव्हेंबरमध्ये भारताने न्यूझीलंडवर, तर तीन दिवसांपूर्वी वेस्ट इंडिजवर निर्भेळ यश संपादन केले. माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली, प्रथम पसंतीचा यष्टिरक्षक ऋषभ पंत आणि अष्टपैलू शार्दूल ठाकूर यांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असून के. एल. राहुल, दीपक चहर दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीत. त्यामुळे भारतीय संघ विश्वचषकाच्या दृष्टीने असंख्य प्रयोग करून खेळाडूंची चाचपणी करू शकतो. लखनऊ येथे होणाऱ्या पहिल्या लढतीत अपेक्षेप्रमाणे दवाचा घटक मोलाची भूमिका बजावणार असून फिरकीपटूंचे येथे वर्चस्व पाहायला मिळेल.

सूर्यकुमार, वेंकटेशची क्रमवारीत मुसंडी

दुबई : सूर्यकुमार यादव आणि वेंकटेश अय्यर या फलंदाजांनी बुधवारी ‘आयसीसी’च्या जागतिक फलंदाजांच्या ट्वेन्टी-२० क्रमवारीत झेप घेतली. वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकावीर ठरलेल्या मुंबईकर सूर्यकुमारने ५६ व्या स्थानावरून थेट २१वा क्रमांक मिळवला. अष्टपैलू वेंकटेशने तब्बल ८८ स्थानांनी मुसंडी मारून ११५ वा क्रमांक काबीज केला. के. एल. राहुलची मात्र दोन स्थानांनी घसरण झाली असून सध्या तो सहाव्या क्रमांकावर आहे. विराट कोहली १०व्या स्थानी कायम आहे. गोलंदाज आणि अष्टपैलूंच्या यादीत भारताचा एकही जण अव्वल १० खेळाडूंत नाही.

बुमराच्या साथीदारांसाठी शर्यत

उपकर्णधार जसप्रीत बुमरा विश्रांतीनंतर संघात परतल्यामुळे भारताचा वेगवान मारा बळकट झाला असून त्याच्या साथीदारांसाठी मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि आवेश खान या चौकटीत कडवी झुंज असेल. रवींद्र जडेजाचेही पुनरागमन झाले असून तो यजुर्वेद्र चहलच्या साथीने फिरकीची बाजू सांभाळेल. त्यामुळे रवी बिश्नोईला संघाबाहेर बसावे लागू शकते. शार्दूल, दीपक यांच्या अनुपस्थितीत वेंकटेश अय्यर अष्टपैलूची भूमिका बजावण्यासाठी सज्ज आहे. दीपक हुडाच्या रूपात आणखी एक अष्टपैलूही भारताच्या ताफ्यात आहे.

हसरंगाची करोनामुळे माघार

‘आयपीएल’च्या लिलावात १०.७५ कोटींची बोली लावण्यात आलेला श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदू हसरंगाला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेला तो मुकणार आहे. हसरंगाच्या अनुपस्थितीत महीष थिक्षणा, प्रवीण जयविक्रमा आणि अशियान डॅनिएल हे त्रिकुट फिरकीची धुरा वाहतील. कर्णधार दसुन शनका, दुश्मंता चमीरा या वेगवान जोडीकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. फलंदाजीत चरिथ असलंका आणि पथुम निसंका यांच्यावर श्रीलंकेची भिस्त असेल.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India sri lanka twenty20 series testing contenders ysh

ताज्या बातम्या