पीटीआय, नवी दिल्ली : थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेमधील ऐतिहासिक कामगिरी वैयक्तिक यशापेक्षाही मोठी आहे. त्यामुळे आता भारताकडे या खेळातील महासत्ता म्हणून पाहिले जाईल, असे मत भारताचे माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पडुकोण यांनी व्यक्त केले. भारताने रविवारी गतविजेता आणि १४ वेळा जेतेपद मिळवणाऱ्या इंडोनेशियावर थॉमस चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ३-० असा विजय मिळवत जेतेपद पटकावले. ‘‘ हे यश इतक्या लवकर मिळेल,याची अपेक्षा मला नव्हती. यासाठी कमीत कमी ८ ते १० वर्षे लागतील असे मला वाटत होते. भारताला आता या खेळातील महासत्ता समजले जाईल. त्यामुळे खेळाला आणखी प्रोत्साहन मिळेल,’’ असे १९८० मध्ये ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे पहिले जेतेपद मिळवणारे पडुकोण यांनी सांगितले.

भारतासाठी हा सुवर्णक्षण असून या कामगिरीतून प्रेरणा घेऊन भविष्यातही असे यश मिळवले पाहिजे. असे पडुकोण यांनी सांगितले. ‘‘ भारताच्या सांघिक कामगिरीमुळे हा विजय मिळवता आला. वैयक्तिक यशापेक्षाही ही कामगिरी मोठी आहे. आपल्याला याची आवश्यकता होती आणि आता मागे वळून पाहण्याची गरज नाही. भविष्यातही असे यश भारताने मिळवले पाहिजे,’’ असे पडुकोण म्हणाले.

‘‘ या कामगिरीनंतर खेळ आणखी लोकप्रिय होईल आणि अनेक युवक खेळाकडे वळतील. याप्रमाणे कॉर्पोरेट आणि सरकारची मदत मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खेळाचा दर्जा सुधारण्यासोबत त्याचा स्तरही उंचावला पाहिजे,’’ असे पडुकोण म्हणाले.  ‘‘ या संधीचा फायदा घेण्याची जबाबदारी ही राष्ट्रीय महासंघ आणि राज्य संघटनांची असेल. येणाऱ्या पाच ते दहा वर्षांत आपण याचा फायदा कसा उचलतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे. खेळामध्ये अधिकाधिक लोकांना सहभागी करुन घेणे आवश्यक असेल.’’असे पडुकोण यांनी सांगितले.

दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन

२०२८चे ऑलिम्पिक दृष्टिपथात ठेवून भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या (बाइ) कार्यकारी परिषदेच्या बैठकीनंतर काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये भारतात जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) दोन आंतरराष्ट्रीय चॅलेंजर्स स्पर्धाचे आयोजन होणार आहे. यासह ११ वर्षांखालील वयोगटासाठी आता राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल.