Shreyas Iyer India New T20I Captain: भारताच्या टी-२० संघाच्या नेतृत्त्वाची धुरा आता श्रेयस अय्यरच्या खांद्यावर असणार आहे. भारताच्या टी-२० क्रिकेटमध्ये आता नव्या पर्वाला सुरूवात झाली आहे. सातत्याने असलेल्या खराब फॉर्ममुळे भारताचा विश्वविजेता कर्णधार सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून पायउतार व्हाव लागलं आहे. याशिवाय सूर्यकुमार यादवला संघातदेखील संधी मिळवता आलेली नाही. याशिवाय १५ वर्षांचा स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशीला टी-२० संघात संधी मिळाली आहे. वैभव सूर्यवंशीला या मालिकांमध्ये पदार्पणाची संधी मिळाल्यास तो सर्वात कमी वय असताना पदार्पण करणारा सर्वात तरूण खेळाडू ठरेल.
भारताचा हा टी-२० संघ आयर्लंड दौरा, इंग्लंड दौरा व यानंतर होणाऱ्या एशियन गेम्ससाठी देखील सारखा असणार आहे. श्रेयस अय्यर भारताच्या टी-२० संघाचा नवा कर्णधार असेल. तर तिलक वर्मा उपकर्णधार असेल. याशिवाय १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ हंगामात वादळी कामगिरी करत अनेक विविध विक्रम आपल्या नावे केले आहेत. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीचं फळ म्हणून त्याला भारताच्या वरिष्ठ टी-२० संघात निवड करण्यात आली आहे.
भारताच्या टी-२० संघात कोणकोणाला मिळाली संधी?
भारताच्या या टी-२० संघात संजू सॅमसन व इशान किशनला विकेटकीपर म्हणून संधी मिळाली आहे. याशिवाय अभिषेक शर्मा, इशान किशनची जागा कायम आहे. त्यानंतर अष्टपैलू खेळाडूंवर अधिक भर देण्यात आला आहे. शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल व वॉशिंग्टन सुंदर यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह इंग्लंड व आयर्लंडविरूद्धच्या दोन्ही टी-२० मालिकांचा भाग नसेल, त्यामुळे वेगवान गोलंदाजी विभागात अर्शदीप सिंगबरोबर मोहम्मद सिराज व प्रिन्स यादव यांना संधी देण्यात आली. आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर मोहम्मद सिराजचं टी-२० संघात पुनरागमन झालं आहे, तर प्रिन्स यादवला वनडेनंतर आता भारताच्या टी-२० संघातही संधी मिळाली आहे.
तर फिरकीपटूंमध्ये कुलदीप यादवला वगळलं असून त्याच्या जागी रवि बिश्नोईला संधी देण्यात आली आहे. तर वरूण चक्रवर्तीचा संघात समावेश कायम आहे. सर्वात चकित करणारी गोष्ट म्हणजे भारताच्या टी-२० संघात हार्दिक पंड्याचा समावेश नसणं. हार्दिक पंड्याला एशियन गेम्समध्येही संघात संधी मिळालेली नाही.
आयर्लंड, इंग्लंड टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरूण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी
जपानमध्ये होणाऱ्या आशियाई गेम्स २०२६ मध्ये पुरूष क्रिकेट सामन्यांकरिता देखील भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघाचं नेतृत्त्वदेखील श्रेयस अय्यर करणार आहे. तर या स्पर्धेकरता जसप्रीत बुमराह संघात परतला आहे आणि मोहम्मद सिराज-प्रिन्स यादव या खेळाडूंना ड्रॉप केलं आहे.
आशियाई गेम्स २०२६ साठी भारताचा संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरूण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वैभव सूर्यवंशी
