जेतेपदासाठी इराणचे कडवे आव्हान
आशियाई स्नूकर सांघिक अजिंक्यपद स्पध्रेच्या उपांत्य फेरीत भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ३-० असे सहज नमवून अंतिम फेरीत धडक मारली आहे. सुवर्णपदकाच्या लढतीत भारतासमोर इराणचे कडवे आव्हान असणार आहे.
आशियाई ६-रेड स्नूकर अजिंक्यपद स्पध्रेत नुकतेच वैयक्तिक जेतेपद पटकावणाऱ्या पंकज अडवाणी आणि कांस्यपदक विजेता आदित्य मेहता यांनी भारताचा विजय साकारला.
आदित्य मेहताने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या मोहम्मद आसिफचा ७३-१६ असा पराभव करून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यात पंकजने अस्जाद इक्बालचा ८३-२५ असा धुव्वा उडवत भर घातली. दुहेरीत पंकज आणि आदित्य या जोडीने आसिफ व इक्बालवर ९२-८ असा दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. दुसऱ्या उपांत्य फेरीत इराणने ३-० अशा फरकाने मलेशियाचे आव्हान सहज परतवले.