नवी दिल्ली : डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत जागतिक गट-१ मध्ये प्रवेश केल्यानंतर भारताचा पहिलाच सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. पाकिस्तान टेनिस महासंघाने या वेळेस त्रयस्थ केंद्रावर खेळण्यास स्पष्ट नकार दिला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २०१९ मध्येही लढत झाली होती. त्या वेळी सुरक्षेच्या कारणावरून लढत त्रयस्थ केंद्रावर कझाकस्तान येथे खेळविण्यात आली होती. त्या वेळेस त्रयस्थ केंद्रावर खेळवण्याच्या निर्णयाचा निषेध करताना पाकिस्तानच्या एहसाम-उल-हक कुरेशी आणि अकिल खान या प्रमुख खेळाडूंनी माघार घेतली होती. भारताने पाकिस्तानचा ४-० असा पराभव केला. या वेळी सामना पाकिस्तानात खेळला जाईल अशी आशा कुरेशीने व्यक्त केली. अकिलनेही भारतीय खेळाडू आम्हाला त्यांचे स्वागत करण्याची संधी देतील असे म्हटले आहे. हेही वाचा >>> R. Ashwin: सहा वर्षात दोन वन डे खेळणारा अश्विन २१ महिन्यांनी परतला, काय आहे रोहित-आगरकरचा प्लॅन? जाणून घ्या पाकिस्तानने भारताप्रमाणे गट-२ मधील लढत जिंकून जागतिक गट-१मध्ये प्रवेश केला आहे. पाकिस्तानने इंडोनेशियावर ४-० असा विजय मिळवला. अकिलने एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही लढती जिंकल्या. पाकिस्तान टेनिस महासंघाचे अध्यक्ष सलीम सैफुल्ला खान यांनी ही लढत ग्रास कोर्टवर खेळवली जाईल असे सांगितले. ‘‘या वेळी आम्ही त्रयस्थ केंद्रावर खेळणार नाही. भारताने पाकिस्तानात यावे. भारतीय संघ आमच्यापेक्षा खूप चांगला आहे. भारतीय खेळाडूंना खेळताना पाहून आमच्याही खेळाडूंना प्रेरणा मिळेल आणि भारतीय खेळाडू येथे खेळले, तर जगासमोर चांगले शेजारी असल्याचा संकेत जाईल,’’ असेही सैफुल्ला यांनी सांगितले. भारताने पाकिस्तानात खेळण्याचा निर्णय घेतल्यास डेव्हिस चषक संघाची ५९ वर्षांतील पहिलीच पाकिस्तान भेट असेल. लिथुआनिया, स्लोव्हाकिया, कोरिया, इराण, थायलंड असे देश पाकिस्तानात येऊन खेळले आहेत. भारताला यायचे नसेल, तर आम्ही हा सामना खेळणार नाही. - सलीम सैफुल्ला खान, अध्यक्ष, पाकिस्तान टेनिस महासंघ