Team India Will Play 2 Matches On Same Day: भारतीय संघ येत्या काही दिवसात अफगाणिस्तानविरूद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जपानला रवाना होणार आहे. त्यामुळे भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये होणारी टी-२० मालिका ही दोन्ही संघांसाठी सराव मालिका असणार आहे. पण याच कालावधीत क्रिकेट चाहत्यांना अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशीच्या फटकेबाजीसह रोहित शर्मा आणि विराट कोहलीची फलंदाजी देखील पाहायला मिळणार आहे. २८ वर्षांनंतर भारतीय संघ पहिल्यांदाच एकाच दिवशी २ सामने खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
भारताचा टी-२० संघ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जपानमध्ये असताना, वेस्ट इंडिजचा संघ ३ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. ३ ऑक्टोबरला भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा वनडे सामना खेळवला जाणार आहे. हा सामना न्यू चंदीगडच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यात शुबमन गिलच्या नेतृ्त्वाखाली खेळणारा भारतीय संघ वेस्ट इंडिजचा सामना करताना दिसेल. तर याच दिवशी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकासाठी झुंज देताना दिसून येणार आहे.
बीसीसीआयकडून आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाच्या नेृतृत्वाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली आहे. या संघात असे काही खेळाडू आहेत, जे वनडे संघाचा देखील भाग आहेत. पण ज्या खेळाडूंना आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संघात स्थान देण्यात आलं आहे, ते खेळाडू वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेत खेळताना दिसून येणार नाहीत. त्यामुळे वनडे मालिकेसाठी युवा खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते.
२८ वर्षांनंतर पहिल्यांदाच असं घडणार
३ ऑक्टोबर हा दिवस भारतीय संघासाठी खास असणार आहे. कारण २८ वर्षांनंतर पहिल्यांदाच असा योगायोग जुळून येणार आहे. याआधी १२ सप्टेंबर १९९८ साली भारताचे २ संघ एकाच दिवशी मैदानात उतरले होते. अजय जडेजाच्या नेतृत्वाखाली खेळणारा एक संघ कॉमनवेल्थ गेम्ससाठी मलेशियाला गेला होता. या सामन्यात भारतीय संघाने कॅनडाला ११२ धावांनी पराभूत केलं होतं. तर आणखी एक संघ कॅनडामध्ये पाकिस्तानचा सामना करण्यासाठी मैदानात उतरला होता. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर ६ गडी राखून विजयाची नोंद केली होती. या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने दमदार विजयाची नोंद केली होती.
