अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपलेल्या २०१९ क्रिकेट विश्वचषकातील सामन्यांच्या वेळापत्रकाची आज घोषणा करण्यात आलेली आहे. मे ३० ते जुलै १३ या कालावधीत ही स्पर्धा इंग्लंडमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार असून ५ जून रोजी हा सामना खेळवला जाणार आहे. तर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारत १६ जूनला मँचेस्टर येथे सामना खेळणार आहे. कोलकात्यात पार पडलेल्या आयसीसीच्या बैठकीत यासंदर्भात घोषणा करण्यात आली. स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक ३० एप्रिलपर्यंत जाहीर केलं जाणार आहे.

आपल्याला ठाऊक आहे की भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. या दोन्ही संघाचा सामना असला की सगळे भारतीय टीव्हीसमोर असतात. दहशतवाद आणि घुसखोरीच्या कारवाया पाकिस्तानकडून सुरु असल्याने भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे टाळलेच होते. पण आता मँचेस्टरमध्ये  हे दोन कट्टर संघ एकमेकांशी भिडणार आहेत.

ठरलेल्या वेळापत्रकानुसार, २०१९ च्या विश्वचषकात भारत आपला पहिला सामना २ जून रोजी खेळणं अपेक्षित होतं. मात्र लोढा समितीने दिलेल्या शिफारसीनुसार, आयपीएलची स्पर्धा व कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १५ दिवसांचा खंड असणं गरजेचं आहे. २०१९ साली आयपीएल स्पर्धा २९ मार्च ते १९ मे या कालावधीत खेळवली जाणार आहे. बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्या पीटीआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली.