scorecardresearch

Premium

ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना आजपासून; ‘आयसीसी’ जेतेपदाचे भारताचे लक्ष्य

गेल्या दहा वर्षांत मर्यादित षटकांच्या सर्व मोठय़ा स्पर्धामध्ये बाद फेरीपर्यंत भारताने धडक मारली.

2023 World Test Championship Final against India Vs Australia
ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना आजपासून

लंडन : आत्मविश्वास दुणावलेला भारतीय संघ बुधवारी ऑस्ट्रेलियासारख्या मजबूत संघाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या  (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यात उतरेल, तेव्हा त्यांचे लक्ष्य गेल्या दहा वर्षांपासून दूर राहिलेले ‘आयसीसी’ जेतेपद मिळवण्याचे असेल.

‘डब्ल्यूटीसी’च्या गेल्या दोन चक्रात भारतीय संघाने सातत्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. गेल्या दहा वर्षांत मर्यादित षटकांच्या सर्व मोठय़ा स्पर्धामध्ये बाद फेरीपर्यंत भारताने धडक मारली. मात्र, त्यांना जेतेपद मिळवता आले नाही. भारताने २०१३ मध्ये इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडक पटकावला होता. त्यानंतर भारताला ‘आयसीसी’ स्पर्धामध्ये तीन वेळा अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. तर, चार वेळा त्यांचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. संघ २०२१ मध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या सुरुवातीच्या फेरीतच बाहेर पडला. गेल्या ‘डब्ल्यूटीसी’ चक्रात भारताने सहापैकी केवळ दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका गमावली. दक्षिण आफ्रिकेतील पराभवानंतर विराट कोहलीने कर्णधारपद सोडले आणि रोहित शर्मावर संघाची जबाबदारी देण्यात आली. भारतीय संघ मायदेशात अपराजित राहिला. इंग्लंडमधील मालिका त्यांनी बरोबरीत राखली. बांगलादेशविरुद्ध कठीण परिस्थितीतून त्यांनी विजय साकारला. ओव्हल येथील या निर्णायक सामन्याचा निकाल काहीही लागला, तरीही संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा संघाबद्दलचा दृष्टिकोन बदलणार नाही. ‘‘ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकणे, इंग्लंडमध्ये मालिका बरोबरीत राखणे, गेल्या पाच-सहा वर्षांत संघाने चांगले प्रतिस्पर्धी क्रिकेट खेळले. तुम्ही ‘आयसीसी’ जेतेपद मिळवा किंवा नाही. मात्र, या गोष्टी कधीही बदलणार नाहीत,’’ असे द्रविडने  अंतिम सामन्यापूर्वी सांगितले.

chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
canada prime minister justin trudeau (1)
कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!

’ वेळ : दुपारी ३ वाजता

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या)

मोहम्मद शमी, विराट कोहलीकडे लक्ष

भारताने दोन वर्षांपूर्वी साउदम्प्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात परिस्थितीकडे दुर्लक्ष करताना दोन फिरकीपटूंना संघात स्थान दिले होते. मात्र, भारताचा हा निर्णय चुकीचा ठरला. ओव्हलच्या १४३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा जूनमध्ये कसोटी सामना होणार आहे. भारतीय संघ रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या फिरकीपटूंच्या जोडीला खेळवण्यास उत्सुक असेल. मात्र, इंग्लंडमध्ये उन्हाळय़ाला सुरुवात झाली आहे आणि चांगल्या खेळपट्टय़ांवर चौथा वेगवान गोलंदाज चांगला पर्याय असू शकतो. यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत संघ व्यवस्थापनाला इशान किशन किंवा केएल भरत यांपैकी एकाची निवड करावी लागेल. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज यांचा सहभाग निश्चित आहे. तिसरा पर्याय म्हणून अनुभवी उमेश यादव व अष्टपैलू शार्दूल ठाकूर यांनी दावेदारी उपस्थित केली आहे. इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळणे नेहमीच आव्हानात्मक असते. भारतीय फलंदाजांसाठी पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि स्कॉट बोलँडसारख्या वेगवान गोलंदाजांचा सामना करणे सोपे नसेल. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या अनुभवी खेळाडूंशिवाय शुभमन गिलची परीक्षा असेल. चेतेश्वर पुजारा कौंटी क्रिकेटमध्ये चांगल्या लयीत होता. या सामन्यात तीच लय कायम राखण्याचा त्याचा प्रयत्न राहील. तसेच, संघात पुनरागमन झालेल्या अजिंक्य रहाणेकडून संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

वेगवान गोलंदाजांवर ऑस्ट्रेलियाची मदार

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना सामन्याआधी फारसा सराव करण्यास मिळाला नाही. तरीही संघ तयारीनिशी या सामन्यात उतरेल. संघातील केवळ तीन खेळाडू ‘आयपीएल’मध्ये सहभागी झाले होते. तर, मार्नस लबूशेन व स्टिव्ह स्मिथ यांनी कौंटी क्रिकेटमध्ये सहभाग नोंदवला. कमिन्सने आपल्या देशातच सराव करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघाच्या शीर्ष क्रमातील फलंदाज वेगवान गोलंदाजीविरुद्ध कशी कामगिरी करतात यावर सामन्याचा निकाल अवलंबून असेल. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाकडून संघाला सर्वाधिक अपेक्षा आहेत. तर, आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नरचा प्रयत्नही चांगल्या कामगिरीचा असणार आहे. या मैदानात स्मिथची सरासरी १००च्या जवळ आहे आणि भारताला सामन्यात बाजू भक्कम करायची झाल्यास स्मिथला लवकर बाद करावे लागेल. खेळपट्टी कशीही असो अनुभवी फिरकीपटू नेथन लायन प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना अडचणी वाढवण्यात सक्षम आहे. तसेच, अष्टपैलू म्हणून कॅमरून ग्रीनची भूमिका महत्त्वाची ठरेल.

सर्व जण जिंकण्यासाठीच खेळतात – रोहित शर्मा

लंडन : संघाचे कर्णधारपद सोडण्यापूर्वी एक किंवा दोन मोठे किताब जिंकण्याचा आपला मानस असून, सर्व जण जिंकण्यासाठीच खेळतात, असे भारताचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका गमावल्यानंतर विराट कोहलीने संघाचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर ही जबाबदारी रोहितकडे देण्यात आली. ‘डब्ल्यूटीसी’ अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला,

‘‘मी असो की आणखी दुसरा कोणी, यापूर्वीही देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची भूमिका ही भारतीय क्रिकेटला पुढे घेऊन जाऊन अधिकाधिक सामने आणि अधिकाधिक जेतेपद मिळवण्याची राहिली आहे. मला ‘डब्ल्यूटीसी’मध्ये जेतेपद मिळवायचे आहे. माझ्या बाबतीतही तसेच आहे. सर्व जण त्याच्यासाठी खेळतात.’’

खेळपट्टीकडून फिरकीपटूंना मदत -तेंडुलकर

लंडन : ओव्हलची खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल असल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध बुधवारपासून सुरू होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम लढतीत भारतीय संघ अधिक आत्मविश्वासाने उतरेल, असे दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने सांगितले. भारताकडे रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजाच्या रूपाने चांगले फिरकीपटू आहेत.

‘‘ओव्हलची खेळपट्टी जसा खेळ पुढे जाईल तशी फिरकीपटूंना मदत करते. त्यामुळे फिरकीपटूंची भूमिका यामध्ये महत्त्वाची असेल. या खेळपट्टीवर फिरकीपटू मिळणाऱ्या उसळीचाही फायदा घेऊ शकतात. त्यामुळे वातावरण ढगाळ राहिल्यास खेळपट्टीतून मदत मिळू शकते. यामुळे ओव्हल भारतासाठी चांगले स्थान आहे,’’ असे तेंडुलकर म्हणाला.

रोहितच्या डाव्या अंगठय़ाला दुखापत

मंगळवारी सरावादरम्यान कर्णाधर रोहित शर्माच्या डाव्या अंगठय़ाला दुखापत झाली. काळजी म्हणून रोहित पुन्हा फलंदाजीसाठी उतरला नाही. मात्र, काही काळजी करण्यासारखे नाही, असे ‘बीसीसीआय’ सूत्रांनी सांगितले.

खेळपट्टीवर  उसळी मिळेल -फोर्टिस

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीसाठी खेळपट्टीवर  चांगली उसळी मिळेल, असे ओव्हलचे मुख्य खेळपट्टी देखरेखकार ली फॉर्टिसने सांगितले. खेळपट्टीकडे पाहता त्यावर गवत दिसत होते, मात्र पहिला दिवसाचा खेळ सुरू होण्यासाठी गवत काही प्रमाणात कापण्यात येईल. तसेच ढगाळ वातावरण राहिल्यास ऑस्ट्रेलियन संघाला मदत मिळू शकते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-06-2023 at 03:46 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×