बॅडमिंटन क्षेत्रात वर्चस्व गाजवणाऱ्या चीनपासून भारत अतिशय दूर आहे, असे मत मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केले आहे. एकंदर स्थानिक स्पर्धाची रचना आणि प्रशासनात या पातळीवर सुधारणा झाल्यास बॅडमिंटनमधील महाशक्तीकडे भारताचा प्रवास होऊ शकेल, असा आशावाद त्यांनी प्रकट केला.

‘‘चीनपासून भारत फार अंतरावर आहे, असे मला वाटते. ही चुकीची तुलना नक्कीच नाही. आम्ही चांगली कामगिरी करीत आहोत, परंतु जागतिक अजिंक्यपद, ऑलिम्पिक आणि ऑल इंग्लंड स्पध्रेतसुद्धा ही कामगिरी उंचावायला हवी. सातत्याने खेळ उंचावत राहिल्यास प्रगती होऊ शकेल,’’ असे गोपीचंद या वेळी म्हणाले.

‘‘कोणत्याही देशातील खेळाडूंची कामगिरी उंचावते. तेव्हा प्रशिक्षक, साहाय्यक प्रशिक्षक यांचा दर्जा उंचावतो. सरकारी रचना आणि धोरणांमध्ये सुधारणा दिसून येते. भारतात खेळाडूंची कामगिरी उंचावते, परंतु प्रशिक्षक, साहाय्यक आणि व्यवस्थापक या पातळीवर ही उंची दिसत नाही,’’ असे ते पुढे म्हणाले.

भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू दिमाखात कामगिरी करीत आहे. किदम्बी श्रीकांत आपल्या खेळाने सर्वाचे लक्ष वेधत आहे. आतापर्यंत झालेल्या सहा सुपर सीरिज स्पर्धापैकी चार स्पर्धावर भारताचे वर्चस्व दिसून आले आहे. इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पध्रेत पी. व्ही. सिंधूने विजेतेपद पटकावले, बी. साईप्रणीतने सिंगापूर खुल्या स्पध्रेद्वारे पहिल्यावहिल्या सुपर सीरिज जेतेपदाला गवसणी घातली. श्रीकांतने इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया अशा दोन सुपर सीरिज स्पर्धा सलग जिंकण्याची किमया साधली.

सायना नेहवाल (लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक) आणि पी. व्ही. सिंधू (रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक) यांच्यासारखे दर्जेदार ऑलिम्पिकपटू घडवणाऱ्या गोपीचंद यांनी सरकारी साहाय्याचे कौतुक केले. मात्र यापेक्षा उत्तम पद्धतीने योजना आखण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले. गोपीचंद पुढे म्हणाले, ‘‘देशातील स्पर्धा आणि प्रशासकीय यंत्रणा जागतिक दर्जाची नाही.