scorecardresearch

BLOG : जेव्हा पर्थवर भारत ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखतो

इशांतचा तो स्पेल आजही क्रिकेट प्रेमींच्या स्मरणात

BLOG : जेव्हा पर्थवर भारत ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखतो

फार पूर्वी, म्हणजे साधारण १९९२-९३ साली ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज मॅच टीव्हीवर बघत होतो. वेस्ट इंडिजच्या तुफानी बॉलिंगसमोर ऑस्ट्रेलिया चाचपडत का होईना पण ८६-३ वर खेळत होती. त्यानंतर आला अँब्रोजचा तो एक ‘फेमस स्पेल’… १ रन देऊन ७ विकेट्स काढल्या की हो पठ्ठ्याने! त्याच्या त्या फास्ट आणि बाऊन्सी बॉलिंगसमोर ऑस्ट्रेलियाचे बॅट्समन पीचवर राहण्यापेक्षा पॅव्हिलिअनमध्ये जाणं जास्त पसंत करत होते आणि ऑस्ट्रेलिया ८६ वरून ११९ ला ऑल आऊट. प्रत्येक न प्रत्येक बॉल हा तोफगोळ्यांसारखा वाटत असणार. कॉमेंट्रीवर अँब्रोजबरोबरच एक नाव सारखं येत होतं “ओह डिअर बॅट्समन, यु हॅव टू बी स्पेशल हिअर… धिस इज नॉट फ्लॅट सरफेस…धिस इज फास्टेस्ट अँड क्वीकेस्ट….धिस इज पर्थ”

तेव्हापासून ‘पर्थ’ ग्राउंडबद्दल खूपच आकर्षण वाटायला लागलं. हे WACA स्टेडियम, जगातली सर्वात फास्ट व बाऊन्सी अशी खेळपट्टी आणि त्याचबरोबर समुद्र जवळ असल्यामुळे फास्ट बॉलर्सना मिळणारा स्विंग ह्या एक अजब कॉम्बिनेशनमुळे पर्थ ग्राउंड हे बॅट्समनसाठी एकदम ‘डेडलीएस्ट ग्राउंड’ म्हणून फेमस झालं होतं. नेहमीच बॅट्समन फ्रेंडली ग्राउंड्सवर मॅचेस बघायची सवय असल्यामुळे ‘पर्थ’ वरच्या मॅचेस बघायला जास्त मजा यायला लागली. पर्थवर कधी एकदा आपली आणि ऑस्ट्रेलियाची टेस्ट मॅच बघतोय असं झालं होतं…पण ज्या गोष्टीची आपण वाट बघतो ती लवकर घडत नाही. १९९९ आणि २००४ दोन्ही टूर्समध्ये पर्थवर आपली आणि ऑस्ट्रेलियायची टेस्ट झाली नाही. फायनली २००८ मध्ये तो योग आला….पर्थच्या WACA वर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट मॅच!

२००८ च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातली ही तिसरी मॅच, आपण सिरीजमध्ये ०-२ नी मागे पडलो होतो. त्यांचे मिचेल जॉन्सन, स्टुअर्ट क्लार्क आणी खुद्द ब्रेट ली हे तिघेही जोरदार फार्मात होते. सचिनसोडून बाकी सगळे दिग्गज ब्रेट ली समोर उभे राहू शकत नव्हते. हे एवढं सगळं घडत असताना आता पुढची मॅच पर्थसारख्या फास्टेस्ट ग्राउंडवर! बाबो…दुष्काळात तेरावा महिना आल्यासारखीच अवस्था. ४ टेस्टच्या सिरीइजमध्ये ‘अलाईव्ह ‘ राहण्यासाठी ही मॅच जिंकणं फार महत्वाचं होतं…पण खरंतर जिंकणं सोडा, ज्या ग्राउंडबद्दल एवढं ऐकलंय, त्या डेंजरस पीचवर आपल्या आत्मविश्वास गमावलेल्या टीमचा निभाव लागणार का हा एक मोठा प्रश्न आमच्यासमोर होता. १९७७ आणि १९९२ साली ह्या पीचवर झालेल्या टेस्टमध्ये आपण सपशेल पराभूत झालो होतो ही एक नवीन माहिती समोर आली. हे असे स्टॅट्स बघितले कि पोटात ऑलरेडी आलेला गोळा अजून मोठा होतो.

सकाळी घाबरत घाबरतच टीव्ही सुरु केला, टॉस झाला आणि कुंबळेने चक्क टॉस जिंकला. मोठ्या आत्मविश्वासाने त्यानी पहिली बॅटिंग घेतली. ब्रेट ली-जॉन्सन तयारच होते आणि त्यांच्यासमोर होते जाफर आणि सेहवाग. जाफर आधीच्या दोन्ही मॅचेसमध्ये फेल गेला होता आणि सेहवाग त्या टूरमधली पहिलीच मॅच खेळत होता. त्या दोघांची सुरवातीची बॅटिंग बघता एखादा शाळेतला मुलगा ब्रेट ली समोर खेळतोय कि असं वाटत होतं. लो कॉन्फिडन्स, त्यामुळे व्हायचं तेच झालं. दोघेही लवकर आउट झाले, भारत ६०-२. पीचवर द्रविड आणि सचिन….तेंडल्यानी आधीच्या टेस्ट मॅचला १५० रन्स केल्या होत्या पण द्रविड…. द्रविड फॉर्मसाठी झगडत होता. पहिल्या टेस्टमध्ये तर त्याला १४ रन्स करायला तब्बल ११४ बॉल्स खेळायला लागले होते. एकूणच चिन्ह १५० मध्ये ऑल आउट व्हायची होती.

पण काहीही म्हणा, फॉर्ममध्ये असो वा नसो… सचिन-द्रविड एकत्र बॅटिंग करताना बघायची मजा काही वेगळीच. अगदी मनसोक्त श्रीखंड-पुरी खाल्ल्यासारखं वाटतं. पर्थ २००८ ला अगदी तसंच झालं. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये त्या दोघांनी जी काही बॅटिंग केली त्याला तोड नव्हती . प्रत्येक बॉल हा नवीन प्रोजेक्ट असल्यासारखा खेळून त्यांनी त्यांची इनिंग बिल्ड करायला सुरवात केली. पेशन्स आणि कॉन्सन्ट्रेशन एकत्र आलं की काय रिझल्ट मिळतो हे त्या दोघांनी दाखवून दिल. ली,जॉन्सन,क्लार्क ह्या इन्फॉर्म बॉलर्स अगेन्स्ट एकदम संयम दाखवून शॉन टेटला अटॅक करायचं स्ट्रॅटेजी त्यांची होती.. आणि त्यात ते यशस्वी देखील झाले. अनुभवी क्रिकेटपटू म्हणजे काय याचं उदाहरण त्यांनी सगळ्यांसमोर ठेवलं. अतिशय अवघड अशा त्या कंडिशन्समध्ये त्यांनी १४० रन्सची पार्टनरशिप केली. फायनली ब्रेट लीच्या सुंदर चेंडूवर सचिन ७८ वर आउट झाला आणि दिवस अखेरीस द्रविडसुद्धा त्याला न शोभणारा स्वीप शॉट मारून झाला. आपण पहिल्या इनिंगमध्ये ३३० रन्स केल्या होत्या, थँक्स टू दीज २ मास्टर्स….!

जे ग्राउंड बॅटिंगसाठी वगैरे लै डेंजर आहे अशा ठिकाणी आपण ३३० रन्स केल्या ही गोष्ट आमच्यासारख्या क्रिकेट प्रेमींना सुखावणारी होती. त्याच वेळेला ऑस्ट्रेलियन पत्रकारांनी त्यावर विरजण सोडण्याचं काम केलं. हे पर्थ ग्राउंड आता पूर्वीसारखं डेंजर राहिलं नाहीये अशा काही कमेंट्स त्यांनी पहिल्या दिवशीच्या खेळानंतर द्यायला सुरवात केली. अशा विकेटवर आर पी सिंग, इरफान पठाण आणि इशांत शर्मा असे नवखे फास्ट बॉलर्स ऑस्ट्रेलायचे २० विकेट्स घेऊ शकतील का? हे असे काही प्रश्न ते विचारायला लागले. आम्ही त्या कॉमेंट्सकडे दुर्लक्ष करत होतो, पण खरंच आपले हे नवीन बॉलर्स २० विकेट काढतील का??? हा प्रश्न झोपू देत नव्हता.

ऑस्ट्रेलियाची बॅटिंग सुरु झाली आणि काय चमत्कार…..आर पी सिंग, इरफान आणि इशांत तिघेही पेटून उठले होते. यंग बॉलर्सकडे ऊर्जा होती. प्रत्येक बॉल हा होमवर्क नीट केल्यासारखा टाकला जात होता. ऑस्ट्रेलियन बॅट्समन बीट होत होते. पॉन्टिंग, हसी, क्लार्क असे तगडे फलंदाज लवकर आउट झाले… ऑस्ट्रेलिया ५ आउट ६१. आमच्यातला इममॅच्युअर फॅन जागा झाला, या “ऑस्ट्रेलियाला १३० च्या आत आउट करा आणि द्या फॉलोऑन” हे असं काहीतरी विचार मनात येत होते. जणू काही सायमंड्स आणि गिलख्रिस्ट नी ऐकले. दोघांनी काउंटर अटॅक केला. ६६-५ वरून ऑस्ट्रेलिया २१२ वर ऑल आउट झाली. पण अखेरीस आपल्याला अतिशय महत्वाचा असा ११८ ला लीड मिळाला होता.

आता फक्त डोकं ठिकाणावर ठेऊन बॅटिंग करणं गरजेचं होतं. पण रिलॅक्स बसून मॅच एन्जॉय करता येईल असे आपले बॅट्समन कुठले! आपली सेकंड इनिंग सुरु झाली तर जाफर, द्रविड आणि सचिन तिघेही लवकर आउट. कशाबशा ३०० रन्स करा आणि ४०० + टार्गेट द्या कांगारूंना अशा प्रार्थना सुरु झाल्या. नाईट वाचमन म्हणून आलेल्या पठाणनी मात्र कमाल केली. ४६ धाव चोपून काढल्या. त्याची फटकेबाजी बघून आपला सेकंड इनिंग मास्टर व्हीव्हीएसला देखील कॉन्फिडन्स आलं असावा. धोनी आणि आरपी सिंगला बरोबर घेऊन त्यांनी आपला स्कोअर पुढे न्यायचं काम केलं. कसे बसे का होईना पण आपण २९४ रन्स वर पोचलो. लक्ष्मण नि ७९ रन्स करून बुडणाऱ्या टीमला काठीने धरून वर काढलं होतं. आता एकच पण फार महत्वाचं काम राहील होतं , ऑस्ट्रेलियाच्या ४०० रन्स व्हायच्या आत त्यांच्या १० विकेट्स काढायचं. २ दिवस ऑस्ट्रेलियाच्या हातात होते. त्यांचे कोणतेही २ बॅट्समन पेटले तर आपलं अवघड आहे ह्याच विचारात चौथी इनिंग बघायला सुरवात झाली. आपले पठाणबाबा जोशात होते.. ओपनर्सला आउट केलं… ३ रा दिवसाचा खेळ सॅम्पला तेव्हा ऑस्ट्रेलिया ६५ ला २ आउट. आपल्याला ८ विकेट्स आणि ऑस्ट्रेलियाला ३५० रन्स हव्या होत्या. पण ज्या प्रकारे पठाण आणि कंपनी बॉलिंग करत होती त्यात आपला विजय समोर दिसत होता.

पर्थ टेस्टचा चौथा दिवस, सकाळी ७ पासून टीव्हीसमोर बसलो. इशांत शर्मा भलत्याच लयीत दिसत होता. पाँटींग आणि हसी अनेक वेळा बीट झाले, पण तो दिवस पाँटींगचा असावा. रडतखडत, चाचपडत पाँटींग खेळत होता….पण तो नॉट आउट होता हे आपल्यासाठी धोकादायक होतं. आता त्यांचे १०० क्रॉस झाले आता त्यांना जिंकायला अजून ३००च हवे होते. इशांत शर्माचा एक लॉन्ग स्पेल संपला होता. कुंबळेनी आरपी सिंगकडे बॉल सोपवला. जाहिरातींच्या ब्रेकनंतर बघितलं तर बॉल पुन्हा इशांतकडे होता. ‘बिटवीन ओव्हर्स’ झालेलं डिस्कशन टीव्हीवर सारखं दाखवत होते. वीरू आणि कुंबळेनी इशांतला “एक और करेगा?” विचारलं. (थँक्स टू स्टम्प माईक…. ) इशांत तयार झाला. संपूर्ण सिरीजमध्ये अतिशय उच्च कॅप्टनशिप करणाऱ्या कुंबळेचा हा जादुई डिसीजन या मॅचचा हाय पॉईंट ठरला, त्याच ‘एक्स्ट्रा’ ओव्हरमध्ये इशांतनी पॉन्टिंगला आउट केलं.

काहीशी डाऊन झालेली आमच्या प्लेयर्सची (आणि आमची सुद्धा) बॉडी लँग्वेज बदलली. पॉन्टिंग हा इशांतचा बकरा ठरला. थोड्यावेळात हसी, सायमंड्स आणि गिलख्रिस्ट आउट झाले. पण तरीसुद्धा हायसं वाटत नव्हतं, २२७-६ असताना मायकल क्लार्क ६० रान्सवर तुफान बॅटिंग करत होता. पण फायनली ८१ रन्स करून तो सुद्धा आऊट झाला. धोनीच्या चपळाईने त्याला स्टम्पिंग केलं. ऑस्ट्रेलिया २५३ ला ८ आउट….आम्ही निःश्वास सोडला…. आता मॅच पूर्ण होण्याची औपचारिकता राहिली होती. आम्ही सेलिब्रेशन करायला लंचसाठी बाहेर पडलो… हॉटेलमध्ये पोहोचून मस्त ऑर्डर करणार तेवढ्यात बघतो तर काय ऑस्ट्रेलिया ३२० ला ८ आउट. ७० रान्सची पार्टनरशिप हे शेपूट लै वळवळ करत होतं. सेलिब्रेशन लवकर सुरु केल्यामुळे असं होतंय असं वाटलं, स्वतःचाच राग आला. पण त्या मॅचचा हिरो इरफान धावून आला आणि त्यानी कांगारुंची शेपूट जास्त वळवळणारी नाही ह्याची खात्री केली. ऑस्ट्रेलिया ऑल आउट झाली होती. ज्या पर्थ विकेटबद्दल एवढं ऐकलं होतं, ज्याची एवढी धास्ती होती त्याच फास्टेस्ट पिचवर आपण ऑस्ट्रेलियायला हरवलं होतं… फटाक्यांची आतिषबाजी सुरु झाली . डिसेम्बरमध्ये दिवाळी सुरु झाली. .. तेवढ्यात कॉमेंट्रीवर हर्ष भोगले नी सांगितलं “ऑस्ट्रेलियाचा सलग १६ मॅचेस जिंकण्याचा पराक्रम भारतानं थांबवलाय”. वाह दिवाळीत, दसरा , होळी, बैलपोळा सुरु झाल्यासारखं वाटलं. त्या पाँटींगचा पडलेला चेहरा एक प्रकारची आत्मशांती देत होता. सचिन, द्रविड आणि लक्ष्मणसारख्या अनुभवी खेळाडूंना आरपी सिंग , इशांत आणि पठाण सारख्या युवा खेळाडूंची जोड मिळाली की जमून आलेलं टीम वर्क, ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच डेडलीएस्ट ग्राउंडवर जाऊन हरवू शकतं हे अवघ्या क्रिकेट विश्वाला आपण दाखवून दिलं होतं. हा आनंद काही वेगळाच होता…..

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-12-2018 at 16:02 IST

संबंधित बातम्या