कपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या

मला हार्दिक पांड्याच राहु द्या !

तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात गोलंदाजीदरम्यान हार्दिक पांड्या

इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत पराभव स्विकारावा लागल्यानंतर भारतीय संघावर जोरदार टीका झाली होती. अनेकांनी हार्दिक पांड्याच्या समावेशाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. मात्र तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ५ बळी घेत हार्दिकने आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. याचसोबत हार्दिकने भारताचे माजी खेळाडू कपिल देव यांच्याशी होत असलेल्या आपल्या तुलनेबद्दलही आपलं मत मांडलं आहे.

“कोणत्याही खेळाडूशी तुलना करण्यात काहीच गैर नाही. मात्र एखाद्या सामन्यात जर माझ्याकडून हवीतशी कामगिरी होऊ शकली नाही तर लगेच माझ्यावर टीका सुरु होते. मला कधीच कपिल देव बनायचं नव्हतं. मी हार्दिक पांड्या आहे आणि मला हार्दिक पांड्याच राहू द्या”, असं म्हणत हार्दिकने कपिल देव यांच्यासोबत आपली तुलना करु नका असं आवाहन केलं आहे. तो पीटीआयशी बोलत होता.

अवश्य वाचा – Ind vs Eng : हार्दिक पांड्या, ऋषभ पंत चमकले; दुसऱ्या दिवशीच्या खेळात ६ विक्रमांची नोंद

“कपिल देव एक सर्वोत्तम खेळाडू होते. आपल्या मेहनतीने त्यांनी त्यांचं विश्व निर्माण केलं होतं. मलाही माझ्या मेहनतीवर माझं नाव मोठं झालेलं पहायचं आहे. त्यामुळे यापुढे माझी कोणत्याही खेळाडूशी तुलना झाली नाही तर मला आनंद होईल.” हार्दिकने आपलं परखड मत मांडलं. दुसऱ्या डावात हार्दिक पांड्याने इंग्लंडचा निम्मा संघ गारद करत भारताला सामन्यावर वर्चस्व मिळवून देण्यात महत्वाचा वाटा उचलला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: India tour of england 2018 dont compare me to kapil dev says pandya