Ind vs Eng : चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी झालेले ९ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का?

पुजारा-विराटच्या साथीने भारताच्या डावाला आकार

चेतेश्वर पुजारा

विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांच्यात झालेली भागीदारी; तळातल्या फलंदाजांना सोबत घेऊन पुजाराने झळकावलेलं शतक या जोरावर भारताने पहिल्या डावात इंग्लंडवर २७ धावांची आघाडी घेतली. पुजाराने पहिल्या डावात नाबाद १३२ धावांची शतकी खेळी केली. दुसऱ्या दिवसाच्या खेळात तब्बल ९ विक्रमांची नोंद करण्यात आली.

१ – कसोटी क्रिकेटमध्ये कमी डावांमध्ये सहा हजारा धावांचा टप्पा गाठणाऱ्यांच्या भारतीय फलंदाजांच्या यादीत एकमेव फलंदाज विराट कोहलीच्या पुढे आहे. सुनिल गावसकर यांनी ११७ डावांमध्ये हा विक्रम केला होता, तर विराट कोहलीला हा विक्रम करण्यासाठी ११९ डाव लागले. यादरम्यान विराटने सचिनला मात्र मागे टाकलं आहे.

२ – सॅम करनचा अपवाद वगळता आतापर्यंत फक्त २ तरुण गोलंदाजांनी विराट कोहीलाला माघारी धाडलं आहे. वेस्ट इंडिजचा अल्झारी जोसेफ (१९ वर्ष २६३ दिवस), बांगलादेशचा फिरकीपटू जुबेर हुसेन (१९ वर्ष २७१ दिवस) हे खेळाडू अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सॅम करनने (२० वर्ष ८९ दिवस) या यादीमध्ये तिसरं स्थान पटकावलं आहे.

५ – गेल्या २७ कसोटींमधलं चेतेश्वर पुजाराने भारताबाहेर केलेलं हे पाचवं शतक ठरलं आहे. या ५ शतकांपैकी ३ शतकं ही श्रीलंकेत, तर एक शतक दक्षिण आफ्रिकेत झळकावण्यात आलं होतं.

५ – कसोटी क्रिकेटमध्ये ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेण्याची मोईन अलीची ही पाचवी वेळ ठरली. आतापर्यंत इंग्लंडच्या १० फिरकीपटूंना अशी कामगिरी करता आलेली आहे.

८ – आतापर्यंत ८ कसोटीपटूंनी विराट कोहलीपेक्षा कमी डावांमध्ये ६ हजार धावांचा टप्पा गाठला आहे. या यादीमध्ये सर डॉन ब्रॅडमन (६८ डाव), गॅरी सोबर्स (१११ डाव), स्टिव्हन स्मिथ (१११ डाव), वॅली हॅमोंड (११४ डाव), लेन हटन (११६ डाव), केन बर्रिग्टंन (११६ डाव), कुमार संगकारा (११६ डाव), सुनिल गावसकर (११७ डाव) हे फलंदाज कोहलीच्या पुढे आहेत.

१५ – कसोटी क्रिकेटमधलं चेतेश्वर पुजाराचं हे १५ वं शतक ठरलं. या शतकासह पुजाराने गुंडप्पा विश्वनाथ यांना मागे टाकलं. विश्वनाथ यांच्या नावावर १४ शतकं जमा आहेत.

२९ – पहिल्या डावात शून्यावर बाद होण्याआधी ऋषभ पंतने तब्बल २९ चेंडू खर्ची घातले. या कामगिरीसह ऋषभने इरफान पठाण आणि सुरेश रैना यांच्या अनोख्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. इरफान पठाणने २००५ साली बंगळुरु कसोटीत पाकिस्तानविरुद्ध आणि सुरेश रैनाने २०११ साली ओव्हल कसोटीत इंग्लंडविरुद्ध २९ चेंडू खेळले होते.

३४ – कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या १७ डावांमध्ये मोईन अलीने भारताचे ३४ बळी घेतले आहेत. फिरकीपटूंमध्ये ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनने भारताविरुद्ध गेल्या ५ वर्षांमधली कसोटी क्रिकेटमध्ये ४२ बळी घेतले आहेत.

५६ – तब्बल ५६ महिन्यांनंतर चेतेश्वर पुजाराने आशिया खंडाबाहेर खेळत असताना शतक केलं आहे. याआधी डिसेंबर २०१३ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग कसोटीत पुजाराने शेवटचं शतक झळकावलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: India tour of england 2018 these 9 records were made and broken during 2nd day of 4th test

ताज्या बातम्या