वर्नेन फिलँडरच्या वादाळात भारताची धूळधाण, केप टाऊन कसोटीत आफ्रिका ७२ धावांनी विजयी

मालिकेत दक्षिण आफ्रिका १-० ने आघाडीवर

फिलँडरच्या माऱ्याचा सामना भारतीय संघाला करता आला नाही.

आफ्रिकेला २०७ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करेल असं वाटत असतानाच, भारतीय संघाने दुसऱ्या डावातही हाराकिरी केली आहे. चहापानाच्या सत्रापर्यंत भारताने आपले ७ गडी गमावत आफ्रिकेच्या हातात सामना आणून ठेवला. डेल स्टेनच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या आफ्रिकेने भारतीय फलंदाजांची चांगलीच दाणादाण उडवली. चांगली सुरुवात करुन दिल्यानंतर सलामीवीर शिखर धवन आणि मुरली विजय हे माघारी परतले. यानंतर एकामागोमाग एक विकेट जाण्याचं सत्र सुरुच राहिलं.

भारताचा एकही फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या माऱ्याचा सामना करु शकला नाही. विराट कोहलीने काही क्षणांसाठी रोहित शर्मासोबत छोटी भागीदारी रचत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो माघारी परतल्यानंतर भारताचा डाव पुन्हा एकदा कोलमडला. पहिल्या डावात ९३ डावांची खेळी करणारा हार्दिक पांड्याही दुसऱ्या डावात फारशी चमक दाखवू शकला नाही. त्यामुळे चौथ्या दिवशीच्या चहापानापर्यंत भारताची अवस्था अतिशय दयनीय झाली.

पहिली कसोटी जिंकण सध्याच्या घडीला भारतीय संघासाठी अतिशय कठीण मानलं जात होतं. मात्र थोड्या वेळासाठी रविचंद्रन आश्विन आणि भुवनेश्वर कुमार यांनी आठव्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी रचत आफ्रिकेच्या गोटात खळबळ माजवली. मात्र वर्नेन फिलँडरने आश्विनला माघारी धाडत भारताची जोडी फोडली. यानंतर मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहचा अडसर दूर करत फिलँडरने आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. फिलँडरने दुसऱ्या डावात ४२ धावांमध्ये ६ बळी घेतले. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतली दुसरी कसोटी शनिवारपासून सुरु होत आहे.

 • केप टाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिका ७२ धावांनी विजयी, मालिकेत १-० ने आघाडी
 • भारताचा दुसरा डाव १३५ धावांमध्ये आटोपला
 • यानंतर मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहला बाद करत फिलँडरकडून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब
 • वर्नेन फिलँडरने रविचंद्रन आश्विनला माघारी धाडत भारताची जमलेली जोडी फोडली
 • दोघांमध्ये ४९ धावांची भागीदारी, आफ्रिकेच्या गोटात खळबळ
 • रविचंद्रन आश्विन आणि भुवनेश्वर कुमारकडून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न
 • चहापानापर्यंत भारतीय संघाची दयनीय अवस्था, अवघ्या ८२ धावांमध्ये ७ गडी माघारी परतले
 • मात्र रबाडाच्या गोलंदाजीवर साहा माघारी, भारताला सातवा धक्का
 • पांड्या – साहा जोडीकडून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न
 • लागोपाठ कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर हार्दिक पांड्या माघारी, भारताचे ६ गडी माघारी
 • फिलँडरच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा माघारी, भारताला पाचवा धक्का
 • शंभरीकडे वाटचाल करत असताना भारताला चौथा धक्का, कर्णधार विराट कोहली माघारी
 • दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी ३२ धावांची भागीदारी
 • रोहित शर्मा – विराट कोहली जोडीकडून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न
 • मात्र चेतेश्वर पुजाराला माघारी धाडत मॉर्ने मॉर्कलचा भारताला तिसरा धक्का
 • चेतेश्वर पुजारा – विराट कोहलीकडून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न
 • ठराविक अंतराने मुरली विजय माघारी, भारताला दुसरा धक्का
 • मात्र भारताची जमलेली जोडी फोडण्यात आफ्रिकेला यश, शिखर धवन माघारी
 • शिखर धवन – मुरली विजय जोडीकडून भारतीय डावाची सावध सुरुवात
 • भारताकडून मोहम्मद शमी आणि जसप्रीत बमुराहला ३-३ बळी, भुवनेश्वर आणि हार्दिक पांड्याला २-२ बळी
 • आफ्रिकेचा दुसरा डाव १३० धावांमध्ये आटोपला, भारताला विजयासाठी २०८ धावांचं आव्हान
 • एबी डिव्हीलियर्स मोठा फटका खेळण्याच्या नादात माघारी
 • पाठोपाठ मॉर्ने मॉर्कल माघारी, दक्षिण आफ्रिकेचा नववा गडी बाद
 • भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर केशव महाराज माघारी, आफ्रिकेला आठवा धक्का
 • दक्षिण आफ्रिकेकडे २०० धावांची आघाडी
 • एबी डिव्हीलियर्स आणि केशव महाराजमध्ये छोटी भागीदारी
 • वर्नान फिलँडर माघारी, आफ्रिकेला सातवा धक्का
 • दुसऱ्या डावात मोठी भागीदारी रचण्यात आफ्रिकेचे फलंदाज अपयशी
 • भरवशाचा क्विंटन डी कॉकही माघारी, दुसऱ्या डावात आफ्रिकेचा संघ ढेपाळला
 • निम्मा संघ माघारी परतल्यानंतर आफ्रिकेकडे अवघ्या १५९ धावांची आघाडी
 • आफ्रिकेची घसरगुंडी सुरुच, जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर कर्णधार डु प्लेसीस माघारी
 • ठराविक अंतराने नाईट वॉचमन कगिसो रबाडा माघारी, आफ्रिकेला चौथा धक्का
 • पहिल्याच सत्रात भारताला लवकर यश, हाशिम आमला शमीच्या गोलंदाजीवर माघारी
 • तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसाने वाया, चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: India tour of south africa 2018 1st test cape town day 4 live updates