नवीन वर्षात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिलीच ३ कसोटी सामन्यांची मालिका २-० ने गमावल्यानंतर, कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका झाली. मात्र भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी विराटच्या बचावासाठी धावून आलेला आहे. चेन्नईत पीटीआयसोबत बोलत असताना धोनीने कोहलीची पाठराखण केली.

“मी सध्या भारतीय संघाला सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला देईन. एखादा कसोटी सामना जिंकण्यासाठी तुम्हाला २० बळी घेण्याची गरज असते, आणि दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांनी ही कामगिरी करुन दाखवलेली आहे. जर तुम्ही २० बळी घेण्यात अपयशी ठरता अशावेळी तुम्ही सामना अनिर्णित राखण्याचा प्रयत्न करता. मात्र यंदाच्या दौऱ्यात भारतीय गोलंदाजांनी अशी वेळ येऊ दिलेली नाही,” असं धोनीने स्पष्ट केलं.

अवश्य वाचा – संधी द्यायची नव्हती मग अजिंक्य रहाणेला उप-कर्णधार का बनवलंत? – बिशनसिंह बेदी

चेन्नईत एका खासगी कार्यक्रमादरम्यान धोनी पत्रकारांशी बोलत होता. कसोटी मालिका गमावल्यानंतर अनेक माजी खेळाडूंनी विराट कोहलीच्या संघ निवडीवर टीकेची झोड उठवली होती. मात्र अशा परिस्थितीत धोनीने विराटची पाठराखण करत, टीकाकारांना संयमाने घेण्याचं आव्हान केलेलं आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातला तिसरा कसोटी सामना २४ जानेवारीपासून जोहान्सबर्ग येथे खेळवला जाणार आहे.