Ind vs WI 1st T20I : भारताचा रडत-खडत विजय, ४ गडी राखून विंडीजवर मात

माफक आव्हानासाठी विंडीजने भारताला झुंजवलं

मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्याच्या पहिल्याच टी-२० सामन्यात विजय मिळवला आहे. विजयासाठी दिलेलं ९६ धावांचं माफक आव्हान पूर्ण करताना भारताला ६ गडी गमवावे लागले. मात्र मधल्या फळीत कृणाल पांड्या आणि रविंद्र जाडेजा यांनी फटकेबाजी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

वेस्ट इंडिजप्रमाणे भारतीय डावाची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर शिखर धवन कोट्रेलच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी परतला. यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र सुनिल नरिनने रोहित शर्मा आणि ऋषभ पंतला लागोपाठच्या चेंडूवर माघारी धाडत भारताला बॅकफूटवर ढकललं. यानंतर मनिष पांडेने कर्णधार विराट कोहलीसोबत छोटेखानी भागीदारी रचली.

विराट-मनिष पांडे जोडी भारताला विजय मिळवून देणार असं वाटत असतानाच किमो पॉलने मनिष पांडेचा त्रिफळा उडवला. त्यानंतर ठराविक अंतराने विराट कोहलीही कोट्रेलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. निम्मा संघ माघारी परतल्यामुळे भारतीय संघ काहीकाळ अडचणीत वाटत होता. मात्र कृणाल पांड्या आणि रविंद्र जाडेजाने फटकेबाजी करत संघाची अधिक पडझड न होऊ देता भारताला विजयपथावर आणलं. विजयासाठी अवघ्या ७ धावा शिल्लक असताना कृणाल पांड्या किमो पॉलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. यानंतर वॉशिंग्टन सुंदरने षटकार खेचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. वेस्ट इंडिजकडून शेल्टन कोट्रेल, किमो पॉल आणि सुनिल नरिन यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.

त्याआधी, भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे पहिल्याच टी-२० सामन्यात विंडीजचा डाव कोलमडला. अमेरिकेतील प्लोरिडा शहरात खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या नवोदीत गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यासमोर विंडीजचा संघ ९५ धावांपर्यंतच मजल मारु शकला. फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने पहिल्याच षटकात कँपबेलला माघारी धाडलं. यानंतर भुवनेश्वरने दुसरा सलामीवीर एविन लुईसचा त्रिफळा उडवत भारताला दुसरं यश मिळवून दिलं. निकोलस पूरन आणि कायरन पोलार्ड यांनी काही क्षणांसाठी फटकेबाजी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र नवदीप सैनीने आपल्या पहिल्याच षटकात निकोलस पूरन आणि शिमरॉन हेटमायरला माघारी धाडत विंडीजला बॅकफूटवर ढकललं.

यानंतर मैदानात आलेलाल रोव्हमन पॉवेलही खलिल अहमदच्या गोलंदाजीवर माघारी परतला. कर्णधार कार्लोस ब्रेथवेट आणि पोलार्डने भारतीय गोलंदाजीचा सामना करत विंडीजचा डाव काही प्रमाणात सावरला. मात्र ब्रेथवेट आणि सुनिल नरिन माघारी परतल्यानंतर विंडीजचा डाव पुन्हा एकदा संकटात सापडला. अखेरीस कायरन पोलार्डने आपल्या अनुभवाचा फायदा घेत, तळातल्या फलंदाजांना सोबत घेऊन संघाला ९५ धावांचा टप्पा गाठून दिला. पोलार्डने ४९ धावांची खेळी केली. भारताकडून नवदीप सैनीने ३, भुवनेश्वर कुमारने २ बळी घेतले. त्यांना वॉशिंग्टन सुंदर, खलिल अहमद, कृणाल पांड्या आणि रविंद्र जाडेजाने १-१ बळी घेत चांगली साथ दिली.

Live Blog

23:16 (IST)03 Aug 2019
वॉशिंग्टन सुंदरने षटकार खेचत भारताच्या विजयावर केलं शिक्कामोर्तब

३ सामन्यांच्या मालिकेत भारताची १-० ने आघाडी, मात्र फलंदाजांकडून पुन्हा एकदा निराशा

23:04 (IST)03 Aug 2019
कृणाल पांड्या माघारी, विंडीजची झुंज सुरुच

किमो पॉलने उडवला पांड्याचा त्रिफळा, भारताचा सहावा गडी माघारी

22:54 (IST)03 Aug 2019
कर्णधार विराट कोहली माघारी, भारतीय संघ अडचणीत

शेल्डन कोट्रेलच्या गोलंदाजीवर पोलार्डने घेतला विराटचा झेल, भारताचा निम्मा संघ अडचणीत

22:43 (IST)03 Aug 2019
मनिष पांडे माघारी, भारताला चौथा धक्का

किमो पॉलने उडवला मनिषचा त्रिफळा

मात्र त्याआधी रोहित-पंत लागोपाट माघारी परतल्यानंतर मनिषने विराटच्या साथीने भारताचा डाव सावरला

22:19 (IST)03 Aug 2019
ऋषभ पंत पहिल्याच चेंडूवर माघारी

नरिनच्या गोलंदाजीवर बेजबाबदार फटका खेळताना पंत भोपळाही न फोडता माघारी

22:17 (IST)03 Aug 2019
रोहित शर्माला माघारी धाडण्यात विंडीजला यश

सुनिल नरिनच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित पोलार्डकडे झेल देत माघारी परतला

भारताचा दुसरा गडी माघारी

21:57 (IST)03 Aug 2019
भारताला पहिला धक्का, शिखर धवन माघारी

शेल्डन कोट्रेलच्या गोलंदाजीवर पायचीत

21:36 (IST)03 Aug 2019
विंडीजचा डाव ९५ धावांवर आटोपला, अखेरचं षटक नवदीप सैनीकडून निर्धाव

भारताला विजयासाठी ९६ धावांचं आव्हान

21:35 (IST)03 Aug 2019
अखेरच्या षटकात कायरन पोलार्ड पायचीत

नवदीप सैनीचा फुलटॉस चेंडू पोलार्डच्या पायावर आदळला, केवळ एका धावेने पोलार्डचं अर्धशतक हुकलं

21:23 (IST)03 Aug 2019
किमो पॉल माघारी, विंडीजला आठवा धक्का

भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर कर्णधार विराट कोहलीने घेतला झेल

21:10 (IST)03 Aug 2019
सुनिल नरिनही झटपट माघारी, विंडीजला सातवा धक्का

रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात खलिल अहमदकडे झेल देत नरिन माघारी

21:10 (IST)03 Aug 2019
कार्लोस ब्रेथवेट माघारी, विंडीजला सहावा धक्का

कृणाल पांड्याने स्वतःच्या गोलंदाजीवर घेतला झेल

21:09 (IST)03 Aug 2019
कायरन पोलार्ड-कार्लोस ब्रेथवेट जोडीची भागीदारी

३४ धावांच्या भागीदारीमुळे विंडीजच्या डाव काहीसा सावरला

20:33 (IST)03 Aug 2019
वेस्ट इंडिजचा निम्मा संघ माघारी

रोव्हमन पॉवेल खलिल अहमदच्या गोलंदाजीवर झेलबाद, ऋषभ पंतने घेतला झेल

20:26 (IST)03 Aug 2019
शिमरॉन हेटमायर माघारी, विंडीजचा डाव घसरला

सैनीचा चेंडू खेळत असताना बॅटची कड लागून चेंडू स्टम्पवर, सैनीला दोन चेंडूत दोन बळी

हेटमायर शून्यावर माघारी, वेस्ट इंडिजची धावसंख्या २८/४

20:24 (IST)03 Aug 2019
वेस्ट इंडिजला तिसरा धक्का, निकोलस पूरन माघारी

सलामीचे फलंदाज माघारी परतल्यानंतर पोलार्डच्या साथीने डाव सावरण्याचा पूरनचा प्रयत्न

मात्र नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात पूरन यष्टीरक्षक ऋषभ पंतकडे झेल देऊन माघारी

20:11 (IST)03 Aug 2019
दुसऱ्याच षटकात विंडीजला आणखी एक धक्का

भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर एविन लुईस त्रिफळाचीत

भुवीचा धीम्या गतीचा चेंडू लुईसला समजला नाही, विंडीजचा दुसरा गडी माघारी

20:03 (IST)03 Aug 2019
पहिल्याच षटकात भारताचा विंडीजला धक्का

वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर कँपबेल कृणाल पांड्याच्या हाती झेल देऊन माघारी.

पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर विंडीजचा पहिला गडी तंबूत परतला

19:48 (IST)03 Aug 2019
असा आहे वेस्ट इंडिजचा अंतिम ११ जणांचा संघ
19:46 (IST)03 Aug 2019
असा आहे भारताचा अंतिम ११ जणांचा संघ
19:38 (IST)03 Aug 2019
भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

चहर बंधू – लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यरला वगळलं

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India tour of west indies 2019 florida 1st t20i live updates psd

Next Story
सचिन संपलेला नाही!
ताज्या बातम्या