पीटीआय, फोर्ट लॉडरहिल : वेस्ट इंडिजवरील वर्चस्व कायम राखताना शनिवारी चौथा ट्वेन्टी-२० क्रिकेट सामना जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी मिळवण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य असेल. या सामन्यात मधल्या फळीतील स्थानासाठी श्रेयस अय्यर आणि दीपक हुडा यांच्यात स्पर्धा आहे.

कॅरेबियन बेटांवर झालेल्या पहिल्या तीन ट्वेन्टी-२० सामन्यांत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने उत्तम कामगिरी केली. त्यांना मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवण्यात यश आले असून पुढील दोन्ही सामने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे रंगणार आहेत. हे दोन्ही सामने जिंकून आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी आपण पूर्णपणे सज्ज असल्याचे सिद्ध करण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यामुळे मुंबईकर श्रेयसचे भारतीय संघातील स्थान धोक्यात आले आहे. श्रेयसला या तीन सामन्यांत अनुक्रमे ०, १० (११ चेंडूंत) आणि २४ (२७ चेंडूंत) धावाच करता आल्या. त्यामुळे केवळ विंडीजविरुद्धचे पुढील दोन सामनेच नाही, तर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठीही श्रेयसला डावलण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याच्या जागी हुडाला संघात स्थान मिळू शकेल. हुडाने सात ट्वेन्टी-२० सामन्यांत ७१.६६च्या सरासरी आणि १७०.६३च्या धावगतीने २१५ धावा केल्या आहेत. विंडीजविरुद्ध उर्वरित दोन सामन्यांत संधी मिळाल्यास हुडाचा दमदार कामगिरीचा मानस असेल.

कर्णधार रोहित उपलब्ध

विंडीजविरुद्ध तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात ११ धावांवर फलंदाजी करत असताना पाठीच्या दुखापतीमुळे भारताचा कर्णधार रोहित शर्माला मैदानाबाहेर जावे लागले होते. मात्र, तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यादरम्यान तीन दिवसांचे अंतर असल्याचा रोहितला फायदा झाला आहे. तो तंदुरुस्त झाला असून उर्वरित दोन सामन्यांसाठी उपलब्ध आहे. त्याच्यासह सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंडय़ा आणि दिनेश कार्तिक या फलंदाजांवर भारताची भिस्त आहे. गोलंदाजीची धुरा रविचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंग आणि भुवनेश्वर कुमार सांभाळतील.

  • वेळ : रात्री ८ वा.
  • थेट प्रक्षेपण : फॅनकोड अ‍ॅप, डीडी स्पोर्ट्स