युवा भारतीय संघाने अंडर-१९ विश्वचषक २०२६ चं जेतेपद पटकावत इतिहास घडवला. टीम इंडियाने इंग्लंडचा एकतर्फी पराभव करत १०० धावांनी सामना जिंकला. या विजयासह टीम इंडियाने सहाव्यांदा अंडर-१९ विश्वचषकावर नाव कोरलं. टीम इंडियाला सहाव्यांदा अंडर -१९ विश्वचषक जिंकून देणारे हे १६ खेळाडू कोण आहेत? जाणून घ्या.
आयुष म्हात्रे – कर्णधार
मुंबईचा युवा स्टार फलंदाज आयुष म्हात्रे कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकला आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने आयसीसी अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाचा मान पटकावला आहे. आयुष म्हात्रेचा जन्म १६ जुलै २००७ ला मुंबईतील विरार येथे झाला. आयुषने वयाच्या सहाव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरूवात केली. आयुषच्या वडिलांनाही क्रिकेटची आवड होती, त्यामुळे त्याच्या वडिलांनी आयुषला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित केलं. पुढे सरावासाठी तो दररोज ८० किमी प्रवास करून मुंबई गाठायचा. मुंबईच्या प्रसिद्ध हॅरिस शिल्ड आणि गिल्स शिल्ड या शालेय स्पर्धांमध्ये खेळताना आयुषने धावांचा पाऊस पाडला. या स्पर्धेत चमकल्यानंतर त्याला मुंबईकडून खेळण्याची संधी मिळाली. २०२५ मध्ये झालेल्या लिलावात आयुष अनसोल्ड राहिला होता. पण त्यानंतर ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाल्याने त्याला संघात स्थान मिळालं आणि ओपनिंगला जाण्याची संधी मिळाली. या संधीचं त्याने सोनं केलं. जुलै २०२५ मध्ये त्याला पहिल्यांदा भारतीय अंडर-१९ संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली.
वैभव सूर्यवंशी
वैभव सूर्यवंशी हे नाव म्हटलं की षटकारांची आतिषबाजी आणि विक्रमी खेळी असं समीकरण दिसतं. वयाच्या १४ वर्षी त्याने क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा तयार केला आहे. फायनल सामन्यात १७५ धावांची सर्वात मोठी खेळी करत भारताच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. वैभवने आधीच आपल्या खेळीनं मनं जिंकली होती, त्यानंतर सामनावीर पुरस्कार सपोर्ट स्टाफला समर्पित करत त्याने पुन्हा सर्वांचं मन जिंकलं. वैभव सूर्यवंशीचं ३५ चेंडूतील आयपीएल शतक सर्वांच्या स्मरणात राहणार आहे. वैभव मूळचा बिहारच्या समस्तीपूरधील आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून तो क्रिकेट खेळत आहे. त्याचे वडील संजीव यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून वैभवला नेट प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. तरुण वयात त्याने रणजी करंडक, हेमंत करंडक, कूचबिहार करंडक आणि विनू मांकड ट्रॉफी खेळली आहे. अंडर-१९ स्पर्धेच्या इतिहासात पहिलं त्रिशतक करण्याची कामगिरी त्याने केली आहे.
विहान मल्होत्रा – उपकर्णधार
भारताच्या अंडर-१९ विश्वचषक संघाचा उपकर्णधार आहे. विहान मल्होत्रा हा उत्तम फलंदाज असून तो आपल्या फिरकीसाठी ओळखला जातो. बांगलादेशविरूद्ध सामन्यात ४ विकेट्स घेत विहानने संघाला विजय मिळवून दिला होता. त्याच्या या गोलंदाजीने सर्वांची मनं जिंकली होती. याशिवाय विहानने अंडर-१९ वर्ल्डकपमधील झिम्बाब्वेविरूद्ध सामन्यात शानदार शतक झळकावलं होतं. विहान शुबमन गिलप्रमाणे मूळचा पंजाबचा आहे. त्याला यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबी संघाने ३० लाख किमतीला लिलावात विकत घेतलं आहे.
आरोन जॉर्ज
अंडर-१९ विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये शतक करत भारताचा डाव आरोन जॉर्जने सावरला होता. आरोन जॉर्जने या सामन्यात सलामीला उतरत १०४ चेंडूत ११५ धावांची मॅचविनिंग खेळी केली होती. आरोनचा जन्म केरळमधला असला तरी तो हैदराबादमध्ये लहानाचा मोठा झाला आहे आणि तो हैदराबादकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. चौथ्या वाढदिवसाला प्लॅस्टिक बॅट गिफ्ट दिल्यानंतर त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरूवात केली. आरोनच्या वडिलांना क्रिकेटपटू व्हायचं होतं, पण लेकाच्या रूपात आपलं स्वप्न पूर्ण केलं आणि त्याच्या कारकीर्दीत मोठी भूमिका बजावली. पोलिसांची नोकरी सोडत त्यांनी कॉर्पाेरेट सेक्टर निवडत लेकाच्या क्रिकेटसाठी वेळ दिला. आरोनने सेमीफायनलमधील हा भारताच्या ऐतिहासिक रन चेसमध्ये सर्वात मोठी भूमिका बजावली.
आर अंबरीश
अंडर-१९ वर्ल्डकप अंतिम सामन्यात मेडन षटकाने सुरूवात करत ३ विकेट्स घेत अंबरीशने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अंबरीश हा वेगवान गोलंदाज असून तो खालच्या फळीत धावांचं उत्तम योगदान देतो. विश्वचषक सामन्यांमध्ये त्याने आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवून दिली आहे. अंबरीश हा मूळचा तमिळनाडूचा आहे आणि तो फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून ओळखला जातो. अंबरीशने न्यूझीलंडविरूद्ध सामन्यात ४ विकेट्स घेत सामनावीर ठरला होता. अनेक क्रिकेटपटूंप्रमाणे अंबरीशचे वडील त्याचे कोच राहिले आहेत. जे स्वत: क्रिकेटपटू असून त्यांनी तमिळनाडू संघाचं अंडर-१९ स्तरावर नेतृत्त्व केलं आहे.
दीपेश देवेंद्रन
दीपेशने अंडर-१९ विश्वचषक अंतिम सामन्यात एका षटकात दोन विकेट्स घेत इंग्लंडच्या मधल्या फळीला सुरूंग लावला. दीपेश हा एक वेगवान गोलंदाज असून तो १३५ किमी प्रति तास चेंडू टाकतो. तर काही वेळेस त्याने १४० चा आकडादेखील गाठला आहे. दीपेश अंडर-१९ विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू ठरला होता, त्याने ५ सामन्यांत १४ विकेट्स घेतल्या होत्या. दीपेशचे वडीलदेखील क्रिकेटपटू होते. ज्यांनी २००७मध्ये तमिळनाडूकडून खेळताना सैयद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली होती.
हेनिल पटेल
अंडर-१९ विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम करत हेनिल पटेलने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. वेगवान गोलंदाजी करणारा हेनिल पटेलदेखील जसप्रीत बुमराहप्रमाणे गुजरातचा आहे. हेनिलने गुजरातसाठी देशांतर्गत पातळीवर सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. नवीन चेंडूने विकेट घेण्याची त्याची क्षमता ही त्याची खासियत आहे. तो अनेकदा त्याच्या आउटस्विंगर्सने फलंदाजांना त्रास देतो. हेनिलने त्या सामन्यात ७ षटकांमध्ये १६ धावा देत २.३० च्या इकॉनॉमीने ५ विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याने एक मेडन षटकही टाकलं.
अभिग्यान कुंडू
नवी मुंबईतल्या चेतन जाधव यांच्या अकादमीत अभिग्यानने क्रिकेटची धुळाक्षरं गिरवली आहेत. वडील सॉफ्टवेअर कंपनीत तर आई डॉक्टर. पालकांनी हस्तक्षेप करायचा नाही अशी अट प्रशिक्षक जाधव यांनी घातली. अभिग्यानच्या पालकांनी प्रशिक्षकांचं ऐकलं आणि भारतीय युवा संघाला गुणी शिलेदार मिळाला. दिवसाला ५००० चेंडूंचा सामना, एक दिवसाआड धावण्याचा सराव आणि पुरेशी विश्रांती हे जाधव यांच्या प्रशिक्षणाचं सूत्र होतं. नवी मुंबईतल्या अविनाश साळवी फाऊंडेशन आणि डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीत सराव करतो. प्रशिक्षक आणि आईवडिलांनी अभिग्यानला दक्षिण मुंबईतल्या अंजुमन इस्लाम शाळेत प्रवेश घेऊन दिला. माजी गोलंदाज अॅबे कुरुविला यांनी त्याची प्रतिभा हेरली. अभिग्यानने मुंबईतल्या वयोगट स्पर्धांमध्ये धावांच्या राशी ओतल्या आहेत. क्रिकेटची आवड जोपासताना त्याने अभ्यासातही चमक दाखवली. दहावीच्या परीक्षेत त्याने ८२ टक्के मिळवले.
वेदांत त्रिवेदी
U19 वर्ल्डकप स्पर्धेत, पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाची अवस्था ४७/३ अशी झाली होती. पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध वेदांतने ९८ चेंडूत ६८ धावांची अत्यंत संयमी खेळी साकारली. चांगल्या खेळाडूंचा सन्मान करत आणि खराब चेंडूवर प्रहार करत वेदांतने भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. आव्हानात्मक खेळपट्टीवर वेदांतने तंत्रकौशल्यासह फलंदाजी केली. शुबमन गिलला पाहून प्रेरित झालेला वेदांत गुजरातकडून खेळतो. शुबमनप्रमाणेच वेदांतचे वडीलच त्याचे पहिले प्रशिक्षक आहेत. त्यांनी वेदांतला दररोज ३०० चेंडू टाकून सराव करायला लावला. सौरव गांगुलीचे व्हीडिओ पाहून त्यातूनही अनेक गोष्टी तो शिकत असतो. सुरुवातीला वेदांत तिशी चाळिशीत बाद होत असे. मात्र प्रशिक्षक हेम जोशीपुरा आणि जेसल केरिया यांच्या मार्गदर्शनात काम करत वेदांतने मोठी खेळी करण्यावर भर दिला.
कनिष्क चौहान
कुस्तीपटूंचं राज्य म्हणून हरियाणा ओळखलं जातं. कनिष्क याच राज्यातल्या झझर गावचा. वडील शेतकरी आणि आई गृहिणी. क्रिकेटसाठी त्याने डेरा सच्चा सौदा इथे राहायचा निर्णय घेतला. वर्ल्डकप स्पर्धेत कनिष्कची भूमिका अष्टपैलू खेळाडूची आहे. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत कनिष्कने २९ चेंडूत धावा केल्या आणि एक विकेट पटकावली. या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आशिया चषक स्पर्धेतही त्याने पाकिस्तानविरुद्ध दमदार कामगिरी केली होती. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर कनिष्क संघाच्या विजयात योगदान देतो. वरिष्ठ संघात हार्दिक पंड्या जी भूमिका निभावतो ते काम या संघात कनिष्क करतो. त्यामुळे संघाला संतुलन मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा आहे.
हरवंश पंगालिया
हरवंश पंगालिया आपल्या दमदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. हरवंशचा जन्म नोव्हेंबर २००६ मध्ये झाला होता. यष्टिरक्षक फलंदाज म्हणून ओळख मिळवलेल्या हरवंशला अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्याची संधी मिळालेली नाही. हरवंशचा जन्म गुजरातच्या गांधीधाममध्ये झाला. त्याच्यावर लहानपणापासून क्रिकेटचे संस्कार झाले. त्याचे वडील देखील क्रिकेट खेळायचे. त्यामुळे लहानपणापासूनच त्याला क्रिकेट खेळायची आवड होती. २०२४ मध्ये ऑस्ट्रेलिया अंडर-१९ संघाविरूद्ध खेळताना त्याने ११७ धावांची दमदार शतकी खेळी केली होती. २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या अंडर-१९ एशिया कप स्पर्धेसाठीही त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलं होतं.
खिलान पटेल
अंडर-१९ वर्ल्डकप फायनलमध्ये अखेरचा उत्कृष्ट झेल टिपत संघाचा विजय निश्चित करणारा खेळाडू ठरला खिलान पटेल. भारताच्या अंडर-१९ संघातील उत्तम फिरकीपटू आणि खालच्या फळीत महत्त्वपूर्ण धावा करणारा खेळाडू खिलान पटेल आहे. खिलान पटेल हा मूळचा गुजरातचा आहे. खिलान पटेलने आतापर्यंत अंडर-१९ आणि अंडर-१९ अ संघाचं प्रतिनिधीत्त्व केलं आहे.
मोहम्मद इनान
दुबईत जन्म झालेला मोहम्मद इनान याने केरळमधील अथ्रेया क्रिकेट अकॅडमीत कोच दिनेश गोपाळकृष्ण यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवले. मोहम्मद इनान हा फिरकीपटू असून तो फलंदाजीतही महत्त्वपूर्ण योगदान देतो. मोहम्मद इनानने ऑस्ट्रेलियाविरूद्ध युथ कसोटी पदार्पणात ६ विकेट्स घेत धुव्वा उडवला होता. त्याने २०२२-२३च्या विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये १०.६८च्या सरासरीने ३२ विकेट्स घेतल्या होत्या.
किशन सिंग
पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत किशन सिंगने प्रतिस्पर्धी संघातील हुझैफा अहसानच्या बुटांचे लेस बांधून दिले होते. किशनच्या या कृतीने चाहत्यांची मनं जिंकली. त्याने खेळभावनेचं उत्तम उदाहरण दिलं. वरिष्ठ संघ एकमेकांशी हस्तांदोलनही करत नसताना किशनची ही कृती अनोखी ठरली. सातत्याने विकेट्स पटकावत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना नामोहरम करणारा शिलेदार. किशन मूळचा बिहारमधल्या नंदलालपूरचा. क्रिकेटसाठी त्याने प्रयागराज गाठलं. तिथे स्वाती सिंग, यश वर्धन आणि शिवराम यांच्या मार्गदर्शनात सराव करतो. आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाचा नेट बॉलर आहे. उत्तर प्रदेश प्रीमिअर लीग स्पर्धेतही चांगली कामगिरी केली होती.
उधव मोहन
U19 वर्ल्डकप आणि विराट कोहली यांचा ऋणानुबंध खास असा. विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाने २००८ मध्ये U19 जेतेपदावर कब्जा केला होता. युवा वर्ल्डकपपासून आंतरराष्ट्रीय छपा उमटवलेल्या विराटने पुढे वरिष्ठ संघासाठी देदिप्यमान कामगिरी केली. आधुनिक क्रिकेटचा अढळतारा म्हणून दिमाखदार प्रदर्शन केलं. याच विराटच्या दिल्लीस्थित अकादमीचा विद्यार्थी उधव मोहन वर्ल्डकप संघाचा भाग आहे. विराट कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा हेच उधवचेही प्रशिक्षक आहेत. उंचपुऱ्या उधवने कूचबिहार करंडकात शानदार कामगिरी केली होती. नॅशनल क्रिकेट अकादमीत झालेल्या शिबिरात त्याने प्रशिक्षकांना प्रभावित केलं. दिल्ली प्रीमिअर लीगमध्येही उत्तम कामगिरी केली होती.

