देवेंद्र पांडे
अभिग्यान कुंडूचे आईवडील जेव्हा नवी मुंबईतल्या चेतन जाधव यांच्या अकादमीत गेले तेव्हा त्यांची प्रशिक्षकांकडे एकच विनंती होती. आमचा मुलाच्या अंगात प्रचंड ऊर्जा आहे, त्याचं काहीतरी करा हे त्यांचं म्हणणं होतं. तो घरात दिवसभर बागडतो. झोपत नाही. त्याच्यातल्या चैतन्याचं काय करायचं असा प्रश्न पडतो. त्याची ऊर्जा क्रिकेटच्या मैदानावर केंद्रित झाली आणि रात्री तो शांत झोपू लागला तर उत्तम.
या ऊर्जावान गुणी मुलाचं रुपांतर व्यासायिक क्रिकेटपटूत होईल याची पालकांना जराही कल्पना नव्हती. हे परिवर्तन घडवण्यासाठी त्यांना एक अतरंगी प्रशिक्षकही लाभला. जाधव यांची शिकवण्याची पद्धत अनोखी आहे. ते फक्त क्रिकेटचं तंत्र शिकवत नाहीत. ते जगायला शिकवतात. अभिग्यानच्या घरचं वातावरण खाऊन पिऊन सुखी होतं. प्रशिक्षकांनी अभिग्यानला घडवताना क्लृप्त्या लढवल्या. त्याला कंफर्ट झोनमधून बाहेर काढलं. त्याला अनारक्षित ट्रेनमधून प्रवास करायला लावला. रेल्वे स्टेशनवर रात्री झोपायला लावलं. उपेक्षित मुलांबरोबर जेवायला लावलं.
फक्त क्रिकेट शिकून उपयोग नाही. जगरहाटी शिकणं आवश्यक आहे. अभिग्यानच्या आजवरच्या प्रवासातले टप्पे जाधव यांच्या कार्यालयात मांडण्यात आले आहेत. स्कोअरकार्ड, रेकॉर्ड्स लिहिलेले कागद, ६००० जीबीचं बॅटिंग फुटेज, चुका आहेत. शनिवारी अभिग्यानने झिम्बाब्वेत सुरू असलेल्या U19 वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध ८० धावांची संयमी खेळी साकारली. अभिग्यानने खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर फटक्यांची पोतडी उघडली. चांगल्या चेंडूंना सन्मान दिला. खराब चेंडूवर प्रहार केला. विकेट्स पडत असताना अभिग्यानने एकखांबी नांगर टाकून डाव सावरला.
अभिग्यानच्या खेळात परिपक्वता दिसली. प्रशिक्षक जाधव यांनी अभिग्यानच्या पालकांकडे एकच मागणी केली होती- त्याच्या प्रवासात पालकांनी हस्तक्षेप करायचा नाही. अभिग्यानचे बाबा टीसीएस कंपनीत काम करतात आणि आई डॉक्टर आहे. या दोघांच्या मुलाकडून असलेल्या अपेक्षा जाधव यांना माहिती होत्या पण तरीही त्यांनी अशी अट घातली. मी कोणत्याही मुलाला मार्गदर्शन सुरू करण्यापूर्वी पालकांची मुलाखत घेतो. ज्यांचे पालक नोकरी करतात त्या मुलांनाच शिकवतो. पालकांनी बाकी गोष्टी सांभाळाव्यात, क्रिकेटचं मी बघतो. मुंबईत खूप सारे पालक मुलाच्या क्रिकेट प्रवासात लुडबूड करतात.
अभिग्यानच्या आईवडिलांनी जाधव यांची विनंतीवजा अट स्वीकारली. सचिन तेंडुलकरला घडवणाऱ्या रमाकांत आचरेकर यांच्या मार्गदर्शनात जाधव घडले. अभिग्यान ११ वर्षांचा होईपर्यंत हा मुलगा स्पर्धात्मक क्रिकेटसाठी तयार असल्याचं जाधव यांना जाणवलं. आचरेकर सरांच्या पद्धतीनेच जाधव यांनी अभिग्यानला शिकवलं. दिवसाला ५००० चेंडूंचा सामना, एकाआडएक दिवसाआड धावण्याचा सराव आणि पुरेशी विश्रांती.
या मुलात काहीतरी विलक्षण हे कधी जाणवलं याबद्दल जाधव सांगतात. मी क्लब क्रिकेटचा सामना खेळत होतो. मी त्याला खेळायला घेऊन गेलो. त्याच्या वयापेक्षा गोलंदाजांचं वय खूप होतं पण तो घाबरला नाही. त्याने शांतचित्ताने फलंदाजी केली. तेव्हाच लक्षात आलं की हा मोठ्या स्तरावर खेळू शकतो.
अभिग्यान सातत्याने धावांच्या राशी ओतू लागला. नवी मुंबईतल्या अविनाश साळवी फाऊंडेशन आणि डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीत तो सराव करत असे. प्रशिक्षक आणि आईवडिलांनी मिळून दक्षिण मुंबईतल्या अंजुमन हायस्कूल मध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. माजी गोलंदाज अॅबे कुरुविला यांनी या डावखुऱ्या खेळाडूची प्रतिभा पाहिली. १३व्या वर्षी अभिग्यानचे आकडे अचंबित करणारे आहेत. दोनदा त्याने चारशेचा टप्पा ओलांडला आहे. दोनदा तीनशे पार केल्या आहेत. त्याच्या नावावर ९ द्विशतकं आहेत.
त्याची धावांची भूक प्रचंड आहे. सामना कुठल्या परिस्थितीत आहे, त्यानुसार तो खेळतो. शंभर होवो किंवा द्विशतक- तो बॅट उंचावत नाही, खेळतच जातो. त्याच्या बॅटिंगवर त्याचं लक्ष असतं. सातत्यपूर्ण प्रदर्शनामुळे मुंबईच्या U16 संघात त्याची निवड झाली. पाठोपाठ नॅशनल क्रिकेट क्लबमध्येही U16, U19 संघात स्थान पटकावलं.
त्याचे आईबाबा प्रशिक्षणात लुडबूड करत नाहीत. अभिग्यानचे बाबा वर्ल्डकपचे सामने लाईव्ह पाहत नाहीत. प्रशिक्षक जाधव त्यांना अपडेट्स देतात. अभिग्यानने शिक्षण पूर्ण करावं असं आईबाबांना वाटतं. क्रिकेट आणि अभ्यास ही कसरत कठीण आहे. पण अभिग्यानने तेही जमवलं आहे. दहावीच्या परीक्षेत त्याने ८२ टक्के मिळवले. आता तो शास्त्र शाखेचं शिक्षण घेतो आहे. वर्ल्डकपमध्ये खेळत असतानाही त्याच्याबरोबर पुस्तकं आहेत. कारण पुढच्या महिन्यात त्याची बारावीची परीक्षा आहे.
वर्ल्डकप, क्रिकेटपेक्षा त्याला परीक्षेची काळजी अधिक आहे असं प्रशिक्षक जाधव गमतीत सांगतात. सायन्सचा अभ्यास सोपा नाही पण तो जमवेल.
अभिग्यान कुंडूसाठी ही सुरुवात आहे. प्रवासात किती पुढे जाणार हे त्याची प्रतिभा, दडपण हाताळण्याची क्षमता, पैसा-प्रसिद्धीला सामोरं जाण्याची ताकद यावर अवलंबून असेल. दिवसभर धुडगूस घालून न झोपणाऱ्या मुलाची ही गोष्ट आहे.
